
अजितदादांच्या गुगलीने अनेकांची उडाली झोप !
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’ला पण चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो, अशी मिश्किली टिपण्णी अजितदादांनी केली, त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या संचालकांच्या पोटात गोळा आला.
आता पुढं सोमेश्वर कारखान्याला चेअमरन होणार आहे, हे काही खरं नाही. ही गंमत होती. नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचंय, त्याची झोप उडायची. आम्ही कुठं जाऊ असा प्रश्न इच्छुकांना पडेल, असे स्पष्टीकरणही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले, त्याामुळे ‘सोमेश्वर’च्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला असेल.
दरम्यान, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या चेअरमनपदाबाबत भाष्य केल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, शहाजी काकडे, आर. एन. शिंदे, प्रमोद काकडे, राजेंद्र यादव, जगन्नाथ लकडे, ऍड. हेमंत गायकवाड, भरत खैरे उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे एक हजार लेखनिक, अधिकारी, शिपाई, चालक यांची भरती होईल. ही भरतीची प्रक्रिया ‘एमकेसीएल’ या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. कुठं वजन ठेवावं लागलं, असं माझ्या कानावर येता कामा नये, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
अजित पवार म्हणाले, आस्मानी संकट कोसळलेल्या पूरग्रस्तांना 2200 कोटींची मदत दिली आहे. ती थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मिळविण्यासाठी मुख्यमंंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. प्रकल्पग्रस्तांना निकषांपेक्षा अधिकचा निधी कसा देता येईल, ते आम्ही पाहतोय. निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही. आम्ही उपकार करत नाही, तर कर्तव्यच करत आहोत.