
महापालिका निवडणुकीत कोणाचा गेम होणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सावधपणे पावले टाकत असताना, महायुतीतही स्वबळाची चाचपणी आणि अंतर्गत तणाव दिसून येत आहे. विशेषत: ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal Elections) भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सूर जुळत नसल्याने स्वबळावर लढण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून मिळत आहेत.
मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याची तयारी
मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि उल्हासनगर भाजप आणि शिंदे गटात तीव्र स्पर्धा दिसत आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता, युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास कार्यकर्त्यांची नाराजी टाळता येईल, अशी भीती दोन्ही पक्षांना वाटत आहे.
ठाण्यात शिंदे गटाची कोंडी?
ठाणे हा शिवसेना (शिंदे गट) साठी पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक येथून पक्षाची ताकद दाखवत आहेत. दुसरीकडे, भाजपकडून आमदार गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गणेश नाईक यांच्या ठाण्यातील “जनता दरबार”ला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने पालघरमध्ये प्रताप सरनाईक आणि नवी मुंबईत नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली “जनता दरबार” सुरू केले आहेत. या राजकीय डावपेचांमुळे ठाणे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.
नवी मुंबईतही भाजप-शिंदे गटात टक्कर
नवी मुंबईत गणेश नाईक यांचे वर्चस्व कायम आहे, तर भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षात प्रभाव वाढत आहे. नवी मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या निवडीतही मंदा म्हात्रे यांच्या शब्दाला महत्त्व देण्यात आले. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे. यामुळे नवी मुंबईतही भाजप आणि शिंदे गटात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदर महापालिका भाजप राखणार?
मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत ९५ जागांपैकी भाजपने एकट्याने बहुमत मिळवले होते, तर एकसंध शिवसेनेला २२ जागा मिळाल्या होत्या. यंदाही भाजप स्वबळावर लढण्यास उत्सुक आहे.
कल्याण-डोंबिवलीत चव्हाणांचे आव्हान
कल्याण-डोंबिवली ही महापालिका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा गड मानली जाते. यंदा प्रथमच पॅनेल पद्धतीने मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते, परंतु निकालानंतर एकत्र आले. यंदा भाजप आपली वाढलेली ताकद दाखवण्यास उत्सुक आहे. स्वबळावर लढल्यास पक्षाचा विस्तार होईल आणि कार्यकर्त्यांची नाराजी टाळता येईल, असा युक्तिवाद भाजप नेतृत्वाकडून केला जात आहे. मात्र, शिंदे गटाने रवींद्र चव्हाण यांच्यावर स्थानिक पातळीवर शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा आरोप केला आहे. चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड हा शिंदे गटाच्या कोंडीचा भाग असल्याची चर्चाही रंगली आहे.
उल्हासनगरात कलानी गटाची भूमिका
उल्हासनगरात भाजपचा आमदार असूनही स्थानिक नेते पप्पू कलानी यांच्या गटाशी त्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी मागील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून लढवली होती. मात्र, अलीकडेच त्यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे उल्हासनगरातही स्वबळाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका
या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही काही ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. ठाणे जिल्ह्यातील काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे किंवा युतीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यास उत्सुक आहे.