
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : ( डहाणू ) अतिवृष्टी आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ६६ महिला आणि लहान मुलांचा जीव वाचला आहे. डहाणू आणि वानगाव पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी जीव धोक्यात घालून केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय हवामान खात्याने २६ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान पालघर जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. याच काळात डहाणूतील धोडीपाडा ब्रिजवर १६ महिला घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर पाण्यात अडकली. डायल-११२ वरून मिळालेल्या तातडीच्या कॉलनंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे, पोलीस निरीक्षक किरण पवार, सपोनि तुषार पाचपुते यांच्यासह अग्निशमन दल आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने सर्व महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
तर दुसरीकडे, वानगाव-चारोटी मार्गावर पिंपळशेत येथे आणखी एक बस पाण्यात अडकली होती. या बसमध्ये ५० महिला आणि लहान मुले होती. सपोनि तुषार पाचपुते आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्वांना सुखरूप बाहेर काढले आणि वानगाव येथे त्यांची जेवण व निवासाची व्यवस्था केली.
या दोन्ही मोहिमेद्वारे एकूण ६६ महिला आणि लहान मुले वाचवण्यात आली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या यशस्वी बचावकार्याचे श्रेय पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच उपविभागीय अधिकारी विकास नाईक व अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू आणि वानगाव पोलिसांच्या अथक प्रयत्नांना जाते.