
फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना मागणी का करत होतात ?
मराठवाड्यात महापूर, अतिवृष्टीने अक्षरश: थैमान घातले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, शेती- पीकं, जनावरे, घरदार अन्नधान्य सगळेच वाहून गेले. अशा परिस्थितीत तातडीने मदत आणि दिलासा देण्याची गरज असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र ओला दुष्काळ असा शब्दच अस्तित्वात नसल्याचे सांगत आहेत. मग विरोधी पक्षनेता असताना तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी का करत होतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून रोहित पवार यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. मराठवाड्यातील पूर परिस्थिती आणि झालेले अतोनात नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मात्र ओला दुष्काळ असा शब्दच नाही, अशा परिस्थितीला टंचाई परिस्थिती असे म्हणतात असा शब्दांचा खेळ करत आहेत. ओला दुष्काळ असा शब्दच अस्तित्वात नव्हता तर मग विरोधी पक्षनेता असताना अजितदादा आणि आपण सभागृहात ओरडून ओरडून जी मागणी करत होतात ते काय होते?
गेल्या तीन महिन्यात 60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. 50% नुकसान एकट्या मराठवाड्यात झाले असून संभाजीनगर जिल्ह्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, लोकांच्या अडचणी सांगितल्या.सरसकट पंचनामे करा, रखडलेल्या जमिनीसाठी वेगळा निधी द्या, विद्यार्थ्यांची शाळा, हॉस्टेलची फी माफ करा, अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, परंतु शासन अजून झोपलेले आहे त्यामुळे तातडीची मदतही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेली नाही, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जी भूमिका घेत आहेत ती दुटप्पीपणाची आहे. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करायचे. आज मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली आहे मग तुम्ही ओला दुष्काळ जाहीर का करत नाही? असा सवाल रोहित पवार यांनी केला. गेल्यावेळी काढलेले पीक विम्याचे निकष बदलले नसते तर आज शेतकऱ्यांना मदत मिळाली असती? असा दावाही पवार यांनी केला.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय, देशातील 40% शेतकरी आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. मात्र राज्यकर्त्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. पिकांना भाव नाही परंतु हमीभाव देण्याचे ढोल बडवणाऱ्यांना याचाही विसर पडला आहे, असा टोला रोहित पवारांनी लगावला. दरम्यान दिवाळीच्या काळात एसटी भाडेवाढ करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल. एकीकडे मदत करायची नाही आणि दुसरीकडे दरवाढीच्या नावाखाली आणखी त्रास द्यायचा, अशीच भूमिका सरकारची दिसते.
पडळकरांना मंगळसूत्र चोर कोणी म्हटलंच नाही..
आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना असभ्य भाषा वापरली. पडळकर पातळी सोडून बोलतात, अध्यात्मिक जागेवरून अशी भाषा जर ते बोलत असतील तर दोन गोष्टी स्पष्ट आहेत. एक तर देवेंद्र फडणवीस यांचे पडळकर ऐकत नाहीत किंवा मग फडणवीस फक्त बहुजन नेत्यांना खालच्या स्तरावर जाऊन भाषण करण्यासाठी वापरून घेतात, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीस स्वतः स्वच्छ राहतात आणि या बहुजन नेत्यांकडून काहीही बोलवून घेतात. पडळकर मंगळसूत्र चोर आहे, असे कोणी बोलले नव्हते त्यांनी अंगावर घेतले. फडणवीस या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही नियंत्रित करणार नसाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही. फडणवीस यांनी स्वतः समोर येऊन सांगावे की पडळकर माझा ऐकत नाही, माझं त्यांना आव्हान आहे, असेही रोहित पवार म्हणाले.