
उद्धव ठाकरेंची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीका…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात विशेषतः मराठवाडात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतीचे आणि घरांचे प्रंचड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
उद्या होणार्या दसरा मेळाव्याच्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.
महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे. मी सरकारला हात जोडून विनंती देखील केली की या संकटात राजकारण न आणता सर्व एकत्र येऊन मार्ग कसा काढता येईल हे पाहू शकतो. पण सरकारची तशी तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री जाहीरातीत व्यस्त आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर देखील स्वतःचे फोटो छापून वाटण्यात मग्न आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. कोणताही विषय आला तर हे दुसरे उपमुख्यमंत्री कधीच दिसत नाहीत, जनता वाऱ्यावर पडलेली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
साखरसम्राट भाजपामध्ये गेले आणि शेकडो-करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडून थकहमी मिळवली. आम्ही मागणी करतोय ती शेतकर्यांसाठी करतोय. ज्या शेतकर्यांना जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधीकधी पत्नीच मंगळसूत्र देखील गहाण टाकावं लागतं. कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज परिस्थिती अशी आहे की डोळ्यांदेखत त्यांचं पीक जमीनीसकट उद्ध्वस्त झालं आहे आणि ते कर्जाच्या ओझ्याखाली दबून मेले आहेत. रोज शेतकरी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकरी भाजपात येण्याची वाट बघताय का?
जर साखर सम्राट भाजपात गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींची हमी सरकार घेत असेल म्हणजेच त्यांनी कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता भरणार. तर या साऱ्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजपा प्रणित सराकर बघतंय आहे का? ही अत्यंत संतापजनक बाब आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकर्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाहीतर तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी ५० हजारांची मदत झाली पाहिजे. बाकीचे देखील खूप विषय आहेत. कारण घरं दारं वाहून गेली आहेत. पंतप्रधान आवास योजना यासारखी ग्रामीण योजना नव्याने आणा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.