
खायला पैसे नाहीत; राहायला घर नाही…
रानू मंडल हे नाव आठवते का? कोलकात्याच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे गाणे गाताना तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रातोरात त्या स्टार झाल्या. तिच्या मधुर आवाजाने देशभरातील लोकांना भुरळ घातली.
चाहते तिला भेटण्यासाठी आणि तिचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी गर्दी करत होते. संगीतकार हिमेश रेशमियाने तिला त्यांच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आणि ती रिअॅलिटी शोमध्येही झळकली. रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली रानू मंडलला सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला. पण, आज पाच वर्षांनंतर तिच्या पुन्हा तिच दयनीय परिस्थिती ओढावली आहे. तिचे राहणीमान आणि घराची अवस्था पाहून मन सुन्न झाले. तिच्याकडे खाण्यापिण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत आणि तिची मानसिक स्थितीही खालावत चालली आहे.
प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवणे सोपे नसते. तसेच मिळाल्यानंतर ती टिकवणे त्याहून कठीण असते. रानू मंडल यांच्या बाबतीत असेच काहीसे घडले. राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू यांना एका व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्यांनी एक व्यवस्थापकही नेमला होता. पण, त्यांच्या स्वभावातील बदल आणि चुकीच्या वर्तनामुळे त्या पुन्हा एका दारुण अवस्थेत पोहोचल्या. चाहत्यांशी उद्धटपणे वागण्याचे आणि त्यांना फटकारण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि हळूहळू त्या लोकांच्या नजरेतून गायब झाल्या.
रानू मंडल यांच्या मधुर आवाजाने देशभरातील प्रेक्षकांना थक्क केले होते. त्यांना अनेक रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आले. २०२० मध्ये हिमेश रेशमिया यांच्या ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटात त्यांनी गाणे गायले. पण, प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. चाहत्यांशी गैरवर्तन आणि अनुचित व्यवहार यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमुळे त्यांची प्रतिमा डागाळली आणि त्यांची लोकप्रियता कमी होत गेली.
पाच वर्षांनंतर, रानू मंडल पुन्हा कोलकात्यातील राणाघाट येथे आढळल्या. एका युट्यूबरने, निशू तिवारीने, त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या सध्याच्या परिस्थितीचे चित्रण केले. त्यांनी पाहिले की, रानू मंडल यांचे घर कचऱ्याने आणि विखुरलेल्या सामानाने भरलेले आहे. घरातून अस्वच्छतेचा वास येत होता आणि भिंतींवर कीटक चिटकलेले दिसले. रानू यांची मानसिक स्थितीही नाजूक झाली आहे. त्या काही मिनिटांपूर्वी बोललेल्या गोष्टी विसरतात आणि त्यांना काहीही समजत नाही. युट्यूबरने असेही नमूद केले की, रानू कोणालाही रिकाम्या हाताने भेटत नाहीत आणि अशा लोकांवर त्या चिडतात.
रानू मंडल यांचे वर्तन आता विचित्र झाले आहे. त्या कधी मोठ्या संपत्तीचा दावा करतात, कधी फसवणुकीचा आरोप करतात, तर कधी अचानक हसतात किंवा रागावतात. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही आणि कुटुंबातील कोणीही त्यांना आधार देण्यासाठी नाही. त्या आता पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत. त्यांना भेटायला येणारे लोक त्यांच्यासाठी अन्न किंवा पैसे आणतात. रानू मंडल यांना आता जगण्यासाठी दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.