
मिमिक्री करणारे फक्त आता…
मतदार यादीत गैरसोयीची नावे काढली जातात. यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासांतच ती नावे गायब केली जातात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहीत नसते.
त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरा कुणी खासगी व्यक्ती चालवत आहे, असा गंभीर आरोप करत, घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी मांडली. राज ठाकरे हेही सध्या महाविकास आघाडीसोबत दिसत असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.
यातच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना आपण आता महाविकास आघाडीसोबत असणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना खोचक टीका केली.
मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील
पत्रकारांनी अजित पवार यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. काम करणारा मी माणूस आहे, मी काम करत राहीन, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. तसेच शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करते? मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यावर तुम्ही राज ठाकरेंना विचारणार जाणार की, अजित पवार असे म्हणत होते. मला या सगळ्यात पडायचे नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही महाविकास आघाडीसोबत दिसत आहात, असे एका पत्रकाराने म्हटले. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. मी २०१७ मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे. कोणा बरोबर होणार हे महत्त्वाचे नाही. २०१७ च्या पत्रकार परिषदेत मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेसपण होती. तसेच अजित पवार पण त्यावेळी होते. खरेतर त्यांनी यायला पाहिजे होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत पण होते. ते पण या सगळ्या गोष्टी सांगत होते, असे राज ठाकरे म्हणाले.