
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधुंना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय व्हायचा असला तरी भाजपला तोडीस तोड लढत देण्यासाठी दोन्ही भाऊ सरसावले असताना नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्यावेळी निर्माण झालेले रुसवे-फुगवे अद्याप दूर होण्याचे नाव घेत नाहीत.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला शहरातील दोन्ही जिल्हा प्रमुखांनी दांडी मारली. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आजारी आहेत तर दुसरे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे हे यावर मौन बाळगून आहेत.
उद्वव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला जिल्हा प्रमुखांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या अनुपस्थितीची गंभीर दखल पक्षातर्फे घेण्यात आली आहे. सध्या महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने जसे सुरू आहे तसे चालू द्या, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आटोपताच मोठ्या फेरबदलाचे सुतोवाच केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
किशोर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. कुमेरिया यापूर्वी या मतदारसंघातून तीन वेळा पराभूत झाले आहेत. मानमोडे यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तेसुद्धा पराभूत झाले होते. असे असताना पुन्हा दोघांनी तिकीट मागितले होते.
संजय राऊत यांनी मानमोडे यांना शब्द दिला होता. शेवटपर्यंत त्यांचेच नाव चर्चेत होते. मात्र काँग्रेसने या मतदारसंघावरचा दावा शेवटपर्यंत सोडला नाही. त्यामुळे शिवसेनेला माघार घ्यावी लागली. तेव्हापासून मानमोडे नाराज आहेत. पक्षाच्या कार्यक्रमांनासुद्धा ते फारशी हजेरी लावत नाही.
आठ दिवसांपूर्वी मानमोडे यांनी जिल्हा प्रमुख या नात्याने मानमोडे यांनी शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संपर्क प्रमुखांना बोलावण्यात आले नव्हते. त्यानंतरही नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे बैठकीला आहे. त्यावरही मानमोडे यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत मात्र पक्ष प्रमुखांना कोणी अहवाल सोपवायचा यावरून मतभेद उफाळून आले होते.
बूथ प्रमुख शहर प्रमुखांना, शहर प्रमुख जिल्हा प्रमुखांना आणि जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखाच्या माध्यमातून आपला अहवाल पक्ष प्रमुखांकडे सोपवतो. तशी यंत्रणा उद्धव सेनेची आहे. असे असले तरी पक्षप्रमुखांना अहवाल कोणी सोपवायचा यावर संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांमध्ये मतभेद उफाळून आले होते. यावर शाब्दिक खडाखडी झाली. मात्र हा प्रकार गैरसमजातून झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे.