ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार ?
ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर शांतता राखण्यासाठी झालेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आपल्या नापाक कारवाया सुरू केल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील लीपा व्हॅली परिसरात २६-२७ ऑक्टोबरला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करून अंधाधुंद गोळीबार केला आहे.
पाकिस्तानकडून हल्ला होत असल्याचे लक्षात येताच भारतीय जवानांनीही पाकिस्तानी चौक्यांवर गोळ्या आणि मोर्टारचा वर्षाव केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करी चौक्यांना मोठे नुकसान पोहोचवण्याच्या इराद्याने पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामुळे नियंत्रण रेषेवरील (LoC) दोन्ही बाजूंमध्ये तणाव तीव्र झाला आहे. भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली तयारी पूर्ण ठेवली असून, पाक सैन्याच्या प्रत्येक गोळीचे जशास तसे उत्तर दिले जात आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
मागील काही काळापासून सीमारेषेवर शांतता होती, परंतु पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे संपूर्ण भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानी चौक्यांवरही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. यामुळे सीमाभागात सध्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


