आम्ही संविधानाला मानणारे आहोत. संविधानात कुठेही ‘वंदे मातरम्’ म्हणणे बंधनकारक असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मी ‘वंदे मातरम्’ म्हणत नाही,” असे विधान माजी आमदार व इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी केल्याने नव्या वादाची चिन्हे दिसू लागली आहेत.
शुक्रवारी (दि. ७) मशाल रॅलीनंतर हजारखोली येथे झालेल्या सभेत शेख यांनी भाजपवर फिरकापरस्त राजकारणाचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले, लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर मालेगावातील मुस्लिम मतदारांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या नावाखाली आमच्या शहरातील निरपराध नागरिकांना तुरुंगात डांबले जाते. महिलांनाही त्रास सहन करावा लागतो. भाजप मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
मालेगाव हे मशिदी आणि मदरशांचे शहर असून धार्मिक शिक्षणाची परंपरा येथे आजही जपली जाते. मात्र बनावट जन्मदाखला प्रकरणाच्या माध्यमातून या शहराला कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेख यांनी सांगितले. त्यांनी आरोप केला की, भाजपने माझा पराभव करण्यासाठी जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणावर पैसे ओतले. अनेक पक्षांनी माझ्याविरोधात कट रचला, तरी मी जनतेच्या प्रश्नांवर लढत राहीन.
शेख यांनी भाजप नेते नितेश राणे, संग्राम जगताप आणि किरीट सोमय्या यांच्यावर मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरवल्याचा आरोप केला. किल्ला झोपडपट्टी आणि बनावट जन्मदाखला प्रकरणावर आमदार मौन का बाळगत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीद खतीब अहमद यांनी पक्षाचे धोरण मांडले. तसेच अबूझर कांदीवाला, जैनुद्दीन बी.ए., महमूद शाह, रिजवान मेमन, इजाज उमर, रियाज अली आदींनी भाषणे केली. शेख यांच्या या विधानानंतर मालेगावच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.


