मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा; राजकारण तापलं !
जम्मू-कश्मीरमधील बडगाम आणि नगरोटा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण जबरदस्त तापल्याचे दिसत आहे. नेशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
भाजप नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांनी 2024 मध्ये भाजपाशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले होते.
शर्मा यांनी दावा केला होता की, उमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा केली होती. एवढेच नाही तर, जर हे खोटे असेल तर, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्याही मशिदीत किंवा धार्मिक स्थळी जाऊन, आपण भाजप सोबत युतीचा प्रयत्न केला नाही, अशी शपथ घ्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
शर्मा यांच्या या आरोपांनंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी लिहिले आहे की, “मी कुराणची शपथ घेऊन सांगतो की, मी 2024 मध्ये राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी अथवा कोणत्याही राजकीय कारणासाठी भाजपशी युती करण्याचा प्रयत्न केलेला नाही.” त्यांनी भाजपावर जाणूनबुजून खोटे पसरवून, जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.
महत्वाचे म्हणजे, उमर अब्दुल्ला यांनी 2024 मध्ये गंदेरबल आणि बडगाम या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढली होती आणि दोन्ही ठिकाणांवर त्यांचा विजय झाला होता. यानंतर, त्यांनी बडगाम जागेचा राजीनामा दिला. यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर, नगरोटा मतदारसंघाचे भाजप आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनानंतर ती जागाही रिक्त झाली होती. येथे ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.


