बडा नेता सोडणार साथ !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढणार आहेत.
दरम्यान या निवडणुकांपूर्वी आता पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक जण आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, तर काही जण आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.
बीडमधलं राजकीय गणित बिघडणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सध्या बीडसह मराठवाड्यात राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी असं चित्र आहे. याचा परिणाम हा या निवडणुकांवर देखील होण्याची शक्यात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांच्या सारखा बडा ओबीसी नेता आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं याचा मोठा फायदा हा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला होऊ शकतो.
दरम्यान दुसरीकडे कोल्हापूरच्या चंदगडमध्ये मात्र नगर पंचायत निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटात युती झाल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे इतरही ठिकाणी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


