सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला पक्षातूनच विरोध झाला आहे. विशेषतः दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांंच्या गटाकडून मानेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांनाही भाजपचे दक्षिण सोलापूरमधील पक्ष पदाधिकारी भेटले आहेत, त्यामुळे मानेंचा भाजप प्रवेश वेटिंगवर आहे. भाजपने वेटिंगवर ठेवलेल्या माजी आमदार मानेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भेटून पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माने (Dilip Mane) यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीपासून माने हे भाजपच्या जवळ गेले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे हे माने यांचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, भाजपमधूनच त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाकडून मानेंच्या पक्षप्रवेश विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच, भाजप (BJP) शहर कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि पालकमंत्री गोरे यांनी दिलीप मानेंचा पक्षप्रवेश होणार असला तर देशमुख गटावर अन्याय होणार नाही, असा शब्द दिला आहे. त्यानंतर पक्षाने निरीक्षक पाठवून अंदाज घेण्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याने माने यांचा प्रवेश थांबला आहे.
खुद्द प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यानंतरही माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेश अजूनही झालेला नाही. भाजपने त्यांना अजूनही वेटिंगवर ठेवले आहे, त्यामुळे मानेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानेंचा पक्षप्रवेश होणे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यांना अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
दरम्यान, माजी आमदार, बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला ‘ब्रेक’ लागल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ११ नोव्हेंबर) रात्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती माने यांची भेट घेतली. त्या भेटीत माने यांना पक्षप्रवेशाची गळ घालण्यात आली आहे. मात्र, मानेंनी आपण लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे म्हटल्याचे या नेत्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह आनंद चंदनशिवे, किसन जाधव, जुबेर बागवान, तौफिक शेख आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी माने यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीकडेही ताकदवान नेतृत्वाची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांनी माने यांच्याशी चर्चा केली. तर लवकरच माने हे पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
ती भेट राजकीय नव्हती : संतोष पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली आहे. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. बँकेच्या कामासंदर्भात आम्ही माने यांना भेटायला गेलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा विषय झालेला नाही, असे सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.


