देशातील क्रिकेट संघटनांपैकी अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (MCA Election) अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तसेच, बुधवारी (12 नोव्हेंबर) उपाध्यक्ष, खजिनदार आणि इतरही महत्त्वाच्या पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार जितेंद्र आव्हाड हेदेखील या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचे कट्टरविरोधी असलेले दोन पक्ष या निवडणुकीसाठी मात्र एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, भाजपचे नेते आशिष शेलार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा प्रचार करणार असल्याचे समोर आले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आणि अजिंक्य नाईक यांच्याकडेच हे पद पुन्हा आले. पण, आता इतर पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या लढती पाहायला मिळणार आहेत. अशामध्ये आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. “आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत.
यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीमध्ये बुधवारी 3 ते 6 वाजेपर्यंत मतदान करून ‘पवार-शेलार’ पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा”, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.
दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलमधून जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. खजिनदारपदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत होईल. सचिवपदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर आणि सहसचिवपदासाठी गौरव पायडे विरुद्ध निलेश भोसले अशी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 275 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 210 मैदान क्लब, 77 कार्यालय क्लब, शाळा आणि महाविद्यालय क्लबचे 36 प्रतिनिधी, 52 माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मतदान करणार आहेत.


