भाजपाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले…
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला आहे. २४३ पैकी तब्बल २०२ जागांवर एनडीएच्या घटकपक्षांनी विजय मिळवला. त्यानंतर आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?
याची चर्चा होत आहे. भाजपा इतर पक्षांना बरोबर घेत सरकार स्थापन करू शकतो का? अशी चर्चा बिहारच्या राजकारणात रंगली आहे. कारण निकालामधून तशी शक्यता निर्माण झाल्याचे दिसत आहे.
एनडीएला २०२० च्या तुलनेत यंदा घवघवीत यश मिळाले आहे. भाजपाने सर्वाधिक ८९ तर त्या पाठोपाठ जदयुने ८५ जागा मिळवल्या आहेत. भाजपाचे मित्र पक्ष लोजप (रामविलास) १९, हम ५ आणि रालोम पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत.
भाजपाकडे ८९ जागा असल्यामुळे लोजप, हम आणि रालोमच्या जागा एकत्रित केल्यास ही संख्या ११७ वर पोहोचते. बिहार विधानसभेचे संख्याबळ २४३ असून बहुमतासाठी १२२ आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे.
बिहारच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि इंडियन एक्सक्लुजिव्ह पार्टीच्या उमेदवाराला प्रत्येकी एका मतदारसंघात विजय मिळविण्यात यश आले आहे. मागच्यावेळेस बसपाच्या तिकीटावर जिंकलेले जमा खान निकालानंतर जदयुमध्ये सामील झाले होते. त्यामुळे यावेळीही असे काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपाचा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याचा अलीकडच्या काळातील अनुभव पाहता १२२ या मॅजिक फिगरसाठी कमी पडत असलेले ५ आमदार गोळा करणे त्यांना फारसे अवघड नाही. मात्र भाजपा असे करणार का? यावर भाजपाचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?
द इंडियन एक्सप्रेसला धर्मेंद्र प्रधान यांनी निकालानंतर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सदर प्रश्न विचारला असता प्रधान यांनी एनडीए अतूट असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच नितीश कुमार हेच एनडीए आघाडीचे नेते आहेत, असेही स्पष्ट केले.
एनडीए अखंड आहे तर मग नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न द इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, सरकार एनडीएचेच बनणार आहे आणि नितीश कुमार हे एनडीएचे सर्वात मोठे नेते असतील. मुख्यमंत्री ठरवेल की, कुणा कुणाला मंत्री करायचे.
भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असायला हवा होता का? असाही प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांना विचारण्यात आला होता. यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, गोंधळ निर्माण करू नका. हा एनडीएचा स्पष्ट विजय आहे. पंतप्रधान मोदींनीही हा विजय एनडीएचा असल्याचे म्हटले आहे. तसेच या विजयामुळे विकासाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले. ही निवडणूक पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली, याबद्दल भाजपाला कोणतीही शंका नाही.


