शहांचा तावडेंना कॉल अन् स्पष्ट सूचना; काय घडलेलं ?
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या दणदणीत विजयात तावडे यांचा मोठा वाटा आहे. बिहारमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
भाजपनं ही किमया पहिल्यांदाच केली आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या नेत्याला तिकीट नाकारण्यात आल्यानं त्याची बरीच चर्चा झाली. पण याबद्दल कोणतीही खळखळ न करता तावडे काम करत राहिले. आता ते राष्ट्रीय पातळीवर पक्षासाठी महत्त्वाचं योगदान दिसत आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाचा श्रीगणेशा केलेल्या विनोद तावडेंनी त्यानंतर भाजपमध्ये जम बसवला. २०१४ मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. तावडे शालेय शिक्षण मंत्री झाले. पण पदवीमुळे ते अडचणीत आले. २०१९ मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं. यानंतर काही काळ त्यांचं नाव कुठेच नव्हतं. पण काही महिन्यातच त्यांना राष्ट्रीय राजकारणात जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
२०२० मध्ये बिहारमध्ये जेडीयू-भाजपचं सरकार आलं. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण २०२२ मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडत लालू प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील राजदशी हातमिळवणी केली. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. जेडीयू-राजदची युती झालेली असताना त्याच आठवड्यात भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विनोद तावडे यांना फोन केला होता.
बिहारमधील राजकीय घडामोडी पाहता अमित शहांनी तावडेंना तातडीचा कॉल केला. हातात असलेली सगळी कामं सोडा. तुम्हाला बिहारला जायचं आहे. पुढील तीन वर्षे बाकी काही करु नका. आपल्याला बिहार जिंकायचंय. कामाला लागा, अशा स्पष्ट सूचना तावडे यांना शहांनी दिल्या होत्या. तेव्हापासून तावडे बिहारच्या राजकारणात सक्रिय झाले. गेल्या तीन वर्षांत त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची पावती आता विधानसभा निवडणुकीत मिळाली.
२०२२ ते २०२५ या कालावधीत विनोद तावडे बिहारमध्ये अक्षरश: तळ ठोकून राहिले. त्यांनी नितीश कुमार यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांशी संवाद वाढवला. राज्यभर दौरे केले. पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यातील जातीय समीकरणं लक्षात घेऊन उमेदवार निश्चित केले. त्याची फळ पक्षाला बिहार निवडणुकीच्या निकालातून मिळाली. भाजप ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात याआधी भाजपला अशी कामगिरी कधीही जमलेली नव्हती.


