सौदीचा ‘हा’ नियम ठरतोय अडथळा…
सौदी अरेबियात एका भीषण बस दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. उमरहा करण्यासाठी गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसची डिझेल टँकरला जोरदार धडक बसली. त्यातून आगीचा भडका उडाला ज्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली.
या अपघातात ४२ जण दगावल्याचे बोलले जाते. मात्र हे मृतदेह भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियाने लावलेला हा नियम मोठा अडथळा ठरत आहे.
सौदी अरेबियाने हज आणि उमरहा यात्रेबाबत स्पष्ट नियम बनवले आहेत. त्यानुसार, जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही. हा नियम कित्येक वर्षापासून लागू आहे, प्रत्येक भारतीय प्रवाशाला याबाबत माहिती दिली जाते. सौदीचा हज कायदा सांगतो की, हज आणि उमरहा धार्मिक यात्रा आहेत, कुठलीही विमा आधारित सरकारी सुविधा नाही. या यात्रेवेळी कुणाचाही मृत्यू झाला तर त्याला कुठलीही नुकसान भरपाई दिली जात नाही. जर भारतात कुणी खासगी विमा केला असेल तर त्यांच्या पॉलिसीनुसार अर्थसहाय्य मिळते. मात्र ही प्रक्रिया सौदी प्रशासनाकडून नव्हे तर संबंधित प्रवाशाच्या देशातून आणि विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाते.
हजला जाण्यापूर्वी भरावा लागतो फॉर्म
हज आणि उमरहा प्रवाशांसाठी एक अधिकृत फॉर्म स्वाक्षरी करून भरावा लागतो. या फॉर्मवर स्पष्ट शब्दात जर यात्रेवेळी प्रवाशाचा मृत्यू झाला, मग ते मक्काला असो, मदीनाला असो वा सौदीच्या कुठल्याही रस्त्यावर, विमानात असो. या मृतकावर अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच केले जातील. जर यावर कुटुंबाने आक्षेप घेतला तर कायदेशीरपणेही मृतदेह परत पाठवता येणे शक्य नाही, कारण प्रवाशांनी आधीच त्यासाठी परवानगी दिलेली असते.
काय घडलं?
सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.


