आता साळवींचा धडाकेबाज निर्णय; उदय सामंतांनाही क्लिनचिट…
रत्नागिरी नगर परिषदेच्या जागा वाटपावरून सध्या शिवसेनेतच वाद उफाळ्याची शक्यता असून येथे प्रभाग क्रमांक 15 च्या उमेदवारीवरून वाद सुरू झाला आहे. येथे राजन साळवी यांच्या मुलालाच तिकीट शिवसेनेनं नाकारल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यातील शीतयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता यावर स्वत: राजन साळवी यांनीच पडदा टाकला असून आपल्या पक्षात अशापद्धतीने कुरघोडी होत नसल्याचे सांगत उदय सामंत आपले नेते असल्याचे म्हटलं आहे.
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून उमेदवारांसह अर्ज भरण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची आणि अपक्षांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक ठिकाणी अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेले नसले तरीही उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत.
अशातच रत्नागिरीत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात राजकीय शीतयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ज्या प्रभाग क्रमांक 15 मधून साळवींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 35 वर्षापासून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत होती. यामुळेच त्यांनी या जागेचा आग्रह मुलगा अथर्व साळवी याच्यासाठी केला होता. तेथून मुलग्याच्या राजकीय वाटचालीसाठी साळवींनी हालचाली सुरू केल्या होत्या.
मात्र या हालचालींना पक्षाकडूनच ब्रेक लावण्यात आला. ही जागा ही जागा भाजपला किंवा अन्य उमेदवार देण्याच्या शक्यता निर्माण झाली. यामुळेच राजन साळवी नाराज झाल्याचे बोलले जात होते. तसेच यात पालकमंत्री उदय सामंत यांचा हात असून त्यांनीच राजन साळवींच्या मुलाची वाट अडल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र आता याबाबत स्वत: साळवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. धाराशिव मध्ये पत्रकारांशी बोलताना साळवी म्हणाले की, प्रभाग क्रमांक 15 ची जागा ही आमच्या वाट्याला येत नाही. तसेच मला सांगण्यात आले आहे. ज्यानंतर मीच मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं.
गेल्या 35 वर्षापासून रत्नागिरीतील ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने आम्ही ती जागा मागितली होती. मात्र महायुतीत ही जागाच आमच्या वाट्याला येत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला. यामुळे उमेदवारीवरून माझ्या नाराजीचा प्रश्न येत नाही. तर मी नाराज असतो तर घरी बसलो असतो असेही स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिले आहे. उदय सामंत हे आमचे पालकमंत्री असून ते आमचे नेते असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर आमच्या पक्षात कुरघोडी होत नसल्याचा निर्वाळा ही राजन साळवी यांनी दिला आहे.


