भाजपला संपवा म्हणणाऱ्यांची तुतारी गायब गोपीचंद पडळकर…
जत नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. भाजपला संपवा म्हणणाऱ्यांची तुतारी आता पूर्ण गायब झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
जत शहरात नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रविकांत अरळी यांनी अर्ज दाखल करताना आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते.
ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून काही नेते ‘भाजपला थांबवा, भाजपला संपवा’ अशी घोषणाबाजी करत होते. पण आज त्यांची ती तुतारीच गायब झाली आहे. जनता कोणाच्या मागे उभी आहे, विकास कुणी केला, आणि शहराची काळजी कोण घेतंय हे जतकरांना चांगलं कळतं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
पडळकर पुढे म्हणाले की, जत शहराच्या विकासासाठी ते स्वतः ब्ल्यू प्रिंट तयार करत आहेत. शहरात कोणत्या सुविधा आणता येतील, कोणते प्रकल्प राबवता येतील, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यांसारख्या मुख्य समस्यांचे निराकरण कसे होईल याबाबत विस्तृत योजना त्यांनी तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. “ज्या दिवशी ही ब्ल्यू प्रिंट आम्ही जनतेसमोर ठेवू, त्या दिवशी विरोधी पक्षाचे कार्यकर्तेदेखील कार्यक्रमात उपस्थित राहावेत, कारण त्यांनाही समजेल की विकास नेमका कोण करतंय,” असा सल्लाही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, ही निवडणूक फक्त उमेदवार उभा करण्यासाठी किंवा नुसते नगराध्यक्ष बसवण्यासाठी आम्ही लढवत नाही. उलट जत शहरासाठी आम्ही मोठं चित्र तयार केलंय आणि आम्ही शहराचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. कोणी म्हणत असेल की गोपीचंद आडवा आहे, तर मी सांगतो मला एकट्याला आडवा म्हणा, पण जत शहराच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही जनतेच्या विरोधात उभे राहता, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना बजावलं.
पडळकर यांनी विरोधकांना खुलं आव्हान देत म्हटलं जी ताकद लावायची तेवढी लावा. जयंतरावांना सांगा, विश्वजीत साहेबांना सांगा, विशालदादांना सांगा कुणाला सांगायचं ते सांगा. पण लक्षात ठेवा, जतच्या लोकांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आणि ही निवडणूक आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर जिंकणार आहोत.
त्यांनी सांगितलं की, भाजपने जत शहरासाठी मागील काही वर्षांत महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अनेक प्रकल्प सुरू केले. नवीन विकासकामांच्या मंजुरीसाठी ते स्वतः पुढे येऊन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “जत शहर बदलणार, याची मला पूर्ण खात्री आहे. जनता आमच्या पाठीशी ठाम उभी आहे,” असे पडळकर म्हणाले.
डॉ. रविकांत अरळी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. अनेक कार्यकर्ते, नागरिक आणि भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता असली, तरी भाजपकडून विजयाचा आत्मविश्वास दिसत आहे.


