मित्रपक्षच आमने-सामने येणार; खेडमध्ये असं काय घडलयं ?
मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून, तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी अर्ज भरण्याच्या अखेरची दिवशी घडल्या आहेत. काल १७ नोव्हेंबर २०२५ या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
रत्नागिरीमधील खेडमध्ये मनसेतून भाजपमध्ये गेलेले वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना भाजप आणि अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगाणात उतरवण्यात आले आहे. तर सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी माधवी बुटाला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना आमने सामने येणार आहेत.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने खेळलेल्या राजकीय खेळीमुळे येथील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खेड नगरपरिषद निवडणुकीत युतीमध्येच राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही 3 जागांवर भाजपकडून अर्ज भरलेत. मात्र जास्त जागांची आमची मागणी पूर्ण होईल, या आशेने इतर ठिकाणी देखील अर्ज भरल्याची सावध प्रतिक्रिया वैभव खेडेकर यांनी दिली आहे.
मनसेतून भाजपमध्ये जाण्यासाठी वैभव खेडेकर यांना वेटिंगवर थांबण्यात आले होते. त्यांच्या पक्षप्रवेशावर अंतर्गत राजकीय घडामोडी घडल्या आणि ते भाजपमध्ये गेले. खेडेकर हे येथील स्थानिक राजकारणातील मोठे नाव आहे. ते मनसेत असताना अनेक आंदोलन त्यांनी केली आहेत. आता त्यांच्या हाती कमळ आले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
जिल्ह्यात इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडककेला दिसेल, असा निर्धार वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत खेडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
आता ‘ही’ प्रक्रिया पार पडणार
२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपली. आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज माघार घेता येणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.


