कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहाणारे हसन मुश्रीफ व समरजित घाटगे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळेच हा समझोता यशस्वी झाला.
या समझोत्यासाठी नेमका आग्रह कोणी धरला हे लपून राहणार नाही. यामागे निश्चित काही कारणे आहेत. गोकुळ व केडीसीसी बँक या जिल्ह्यातील दोन बलाढ्य आर्थिक गडाच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर जमेल तेथे बेरजेचे राजकारण सुरू आहे. या समझोत्यासाठी समरजित घाटगे यांना आगामी लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आल्याचे समजते. तर या चर्चेत हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांना घाटगे यांचा निवडून आणण्याचा शब्द दिल्याचे समजते. आता घाटगे हे शरद पवार राष्ट्रवादीची साथ सोडून महायुतीतील कोणत्या घटक पक्षात प्रवेश करणार ते पाहावे लागेल.
अलीकडेच हसन मुश्रीफ यांना घाटगे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘कागलमध्ये अनेक घाटगे आहेत’ असे उत्तर दिले होते. यापूर्वीही संजय घाटगे यांच्याशी कट्टर राजकीय वैर व न तुटणारी मैत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय विद्यापीठाने पाहिली आहे. त्यानंतर समरजित घाटगे व मुश्रीफ यांच्यातील कट्टर वैर व राजकीय समझोता जनता पाहणार आहे.
कागल नगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागणे यामागे निश्चित काहीतरी कारणे असणार हेही तेवढेच स्पष्ट आहे. समझोता हा विषय नाही तर त्यासाठी आग्रह कोणी धरला हे जनतेसमोर आले पाहिजे. कारण दोन्ही बाजूंनी भरपूर संघर्ष झाला आहे. कागल आणि संघर्ष नवीन नाही. घाटगे-मंडलिक वादात प्रत्येक निवडणुकीनंतर दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक ठरलेलीच. मुश्रीफ-घाटगे वादही असाच. विधानसभेच्या आखाड्यात हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात मतदारसंघाने दोन वेळा संघर्ष अनुभवला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र व 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून समरजित घाटगे मैदानात होते. मात्र दोन्ही वेळा त्यांना मुश्रीफ यांनी पराभूत केले. विधानसभेच्या आखाड्यात परस्परांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या हे दोन मातब्बर विरोधक एकत्र कसे आले?
आगामी काळात गोकुळ व केडीसीसी बँक या जिल्ह्याच्या दोन बलाढ्य आर्थिक गडाच्या निवडणुका होणार आहेत. वर्षानुवर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता राहिलेल्या या गडावर आता हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे. केडीसीसी बँकेत हसन मुश्रीफ तर गोकुळला त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ अध्यक्ष आहेत. महायुतीचे नाव असले तरी सगळा कारभार हा मुश्रीफ पिता-पुत्रांच्या हातात आहे. त्यांना आता या आर्थिक गडावरील पकड अधिक घट्ट करायची आहे. जेवढा विरोध कमी, तेवढी वाटचाल सोपी असे त्यांना वाटत असावे. महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व हवे आहे. विधानसभेच्या दहाही जागांवर महायुतीला यश मिळाले. आता विधानसभेचे दहाही आमदार महायुतीचे आहेत. मात्र लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा शिवसेनेकडे असली तरी दुसरी जागा काँग्रेसकडे आहे. त्याठिकाणी आता भाजपला आपला हक्काचा खासदार हवा आहे. त्यादृष्टीने कागलच्या या समझोत्याकडे पाहावे लागेल. विधानसभा निकालानंतर समरजित घाटगे भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र 2029 पर्यंत कोणतीच निवडणूक नसताता विनाकारण घाटगे का रिस्क घेतील, हा प्रश्न निरुत्तर करणारा होता.
कागलचा समझोता हे या प्रश्नाचे उत्तर आहे. घाटगे हे योग्यवेळच्या राजकीय मुहूर्तावर भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी समझोता घडवून आणताना पक्षाचे हित पहिल्यांदा पाहिले असणार, यात शंका नाही. त्यामुळे घाटगे यांचा भाजप प्रवेश, त्यांना लोकसभेची उमेदवारी व त्यांच्या विजयाची हसन मुश्रीफ यांची हमी हेच सूत्र यामागे असल्याचे सांगण्यात येते.
धनंजय महाडिक व संजय मंडलिक यांना शह
मुख्यमंत्र्यांकडील चर्चेत आगामी लोकसभेसाठी समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याचे ठरले असेल तर तो भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक तसेच शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांना राजकीय शह दिल्याचे मानले जात आहे. कारण मंडलिक व महाडिक हे दोघेही आगामी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र आता घाटगे यांची यामध्ये एंट्री झाल्यामुळे तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
मुश्रीफांना हवे मुख्यमंत्र्यांचे सहकार्य
मुश्रीफ व घाटगे यांच्या एकत्र येण्यामुळे आगामी सहकारातील निवडणुकीवर परिणाम होणार आहेत गोकुळ व केडीसीसीसाठी घाटगे यांची ताकद मर्यादित असली तरी मुश्रीफ यांना त्यांचा असणारा विरोध मावळणार असून विरोधकांच्या स्टेजवरून होणार्या प्रचारातील टीकेची धार मंदावणार आहे. त्याहीपेक्षा गोकुळच्या संघर्षात मुश्रीफ यांना मुख्यमंत्र्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. गोकुळचा संघर्ष अटीतटीचा होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याची चुणूक दिसली. बहुमत असूनही व नाव निश्चित करूनही ऐनवेळी अध्यक्षपदाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की गोकुळचे नेतृत्व करणार्यांवर आली. आताही गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. पण ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्याशी दिलजमाई करत गोकुळच्या निवडणुकीच्यादृष्टीने भक्कम पाऊल टाकले आहे. एका बाजूला कागल नगरपालिकेतील अर्धी सत्ता घाटगे यांच्याकडे देत असताना गोकुळच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याची अपेक्षा मुश्रीफ यांनी ठेवली असणार हे स्पष्ट आहे.
संजय घाटगे यांची भूमिका काय?
समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असतानाच अचानकपणे संजय घाटगे यांनी भाजपत प्रवेश केला. ही अचानक झालेली नव्हे, तर समरजित यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी घडवून आणलेली घटना होती. मात्र आता समरजित घाटगे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केल्यामुळे संजय घाटगे काय करणार याकडे लक्ष लागले आहे.


