हे सांगताना मन खरचं भारी होतय…
रत्नागिरीत सध्या नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे टेन्शन वाढणारी घटना घडली आहे. येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलाचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे. तर साळवी यांनी त्यांनी सामंत यांना क्लिन चीट देत तेच आमचे नेते असून आपण मुलाला थांबण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. पण आता त्यांचा मुलगा अथर्व साळवी याची भावनीक पोस्ट व्हायरल झाल्याने ते शिवसेनेची सर्व पदे सोडतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वडील साळवी यांनी कोणाच्या दबावात येवून ते स्टेटमेंट दिलं असा सवाल आता जिल्ह्यात केला जातोय.
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी याने अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र त्यांचा पत्ताच पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कट केला. यामुळे अथर्व साळवी यांच्यासह राजन साळवी प्रचंड नाराज झाल्याची चर्चा होती. तसेच रत्नागिरीत पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत वादासह राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या सर्व चर्चांना राजन साळवी यांनी धाराशिवमध्ये ब्रेक लावत ही जागा भाजपला जात असल्याने आपणच मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आपली प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली असून नंतर रत्नागिरीचे नगराध्यक्ष झालो. त्यानंतर आमदारही झालो. गेली 35 वर्ष ही जागा शिवसेनेकडे होती म्हणून आम्ही ती मागितली होती. पण जेव्हा ती शिवसेनेला येणार नाही हे स्पष्ट झाले तेंव्हाच मीच मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
आता या स्पष्टीकरणानंतर मुलगा अथर्व साळवी याची व्हायरल झालेली पोस्ट येथे वेगळीच खिचडी शिजल्याचे सांगत आहे. अथर्व साळवी यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहली आहे. ज्यामुळे आता रत्नागिरी शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून ते शिवसेनेची सव्र पदे सोडतील असा तर्क लावला जातोय.
काय म्हटलं आहे अथर्व साळवी यांनी?
नमस्कार, मी अथर्व राजन साळवी रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 15 मधून आपल्यासाठी लढण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु महायुतीच्या निर्णयामुळे मला या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे. आणि हे सांगताना मन खरंच भारी होतंय.
गेल्या काही दिवसांत माझ्या पाठीशी उभं राहिलेल्या सर्व ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, खांद्यावरची थाप देणं हे सगळं विसरणं माझ्यासाठी शक्यच नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास… हे माझं खरं बळ आहे. पण आता मी नेतृत्व सोडत आहे, मात्र लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही.. पण जबाबदारी तशीच आहे, आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो… माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो की मी 24 तास, दिवस असो वा रात्र.. कुठलीही अडचण आली तरी तुमच्यासाठी उभा आहे. राजकारण बदलू शकतं…. पदं येतात-जातात… पण नातं ? ते मात्र कायम राहतं – तुमचं आणि माझं. ज्या प्रभाग क्रमांक 15 मधून वडिलांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली तेथून आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात व्हावी म्हणून अथर्व साळवी यांनी दंड थोपाटले होते.
पण शिवसेनेनं त्यांना तिकीट न देता त्यांना विश्वासात घेतले नाही. यामुळे आता ते नाराज असल्याची माहिती समोर येत असून ते आपल्या पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेचे युवासेना कार्यकारणी सदस्य आणि कोकण निरीक्षक पदाची जबाबदारी आहे.


