निलंगा नगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यापासून तयारीत असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला ‘आशियाना'(दिलीपराव देशमुख यांचे निवास्थान) येथून शेवटपर्यंत हिरवा कंदील असताना ‘गढीवरून’ (अमित देशमुख यांचे निवास्थान) अखेरच्या काही मिनिटात ब्रेक लावून उमेदवार बदलण्यात आला. त्यामुळे आशियानावरून हिरवा कंदील असलेल्या उमेदवाराला गढीवरून ब्रेक लागल्याची जोरदार चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती.
अजित नाईकवाडे यांची उमेदवारी ऐनवेळी कापल्याने बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. काही कार्यकर्त्यांना आश्रू अनावर झाले तर नाईकवाडे यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे खासदार व निरीक्षक त्यांच्या घरी सायंकाळपर्यंत ठाण मांडून होते. अमित देशमुखांनीही त्यांना फोन केला. मात्र फायनल असलेली उमेदवारी कोणत्या कारणामुळे कापली याचे कोडे अजूनही काँग्रेस कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही. मागील विधानसभा निवडणुकीपासून अशोक पाटील निलंगेकर यांना डावलून काँग्रेसने जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांना उमेदवारी दिली होती.
तेव्हापासून निलंगा विधानसभा मतदारसंघात ‘देशमुख विरूध्द निलंगेकर’ अशी गटबाजी अधिक गडद होत गेली. नगरपालिका निवडणुकीत उमेदवार निश्चिती वरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचे मनोमिलन करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु फारसे यश पक्षश्रेष्ठीला आल्याचे दिसत नाही. या दोन गटावर तोडगा काढण्यासाठी श्रेष्ठींकडून जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची खास नेमणूक करण्यात आली होती.
अशोक पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी बराच वेळ बैठक झाली. त्यानंतर अध्यक्ष पदावरून अजित नाईकवाडे यांच्या नावाला संमती मिळाली. शिवाय काही नगरसेवक पदाबाबतही वाटाघाटी सुरु असताना अखेरच्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष हमिद शेख यांच्या उमेदवारी अर्ज सोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म लावला जात असल्याची कुजबूज सुरू झाली. काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आणि तणाव वाढला.
अखेरच्या क्षणापर्यंत अजित नाईकवाडे यांचे नाव अंतिम होते ऐनवेळी गढीवरून म्हणजे अमित देशमुख यांच्या कडून कोणता ‘मेसेज’ आला निरीक्षक विजय देशमुख व अभय साळुंके यांच्यात गुफ्तगू होऊन काही मिनिटात हमीद शेख यांच्या उमेदवारीला एबी फॉर्म लावण्यात आला. यावेळी नाराजी दाखवत काही काँग्रेस कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या बाहेर पडले. आपली उमेदवारी पक्की नाही हे समजताच अजित नाईकवाडे यांनीही थेट आपले घर गाठले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना आश्रू आनावर झाले होते.
काँग्रेसमधील हा प्रकार खासदार डॉ. शिवाजी काळगे हे उघड्या डोळ्यांनी पाहतच राहीले. अंतिम ठरलेला उमेदवार का बदलला? याचे कोडे त्यांनाही उलगडले नाही. राजकारणाचा फारसा सहवास नसलेले व डावपेच काय असतात याचा तसूभरही अनुभव नसलेले सरळ स्वभाव मितभाषी खासदार शिवाजी काळगे यांना कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कसे व काय काय राजकारण घडते? याचा प्रत्यय या निमित्ताने आला. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून तयारी अन् नगराध्यक्ष पदाची उमेदवारी फिक्स समजून चाललेल्या नाईकवाडे यांना पक्षाच्या नेत्यांनी ऐनवेळी दगा दिला. एका निष्ठावंत कार्यकर्त्याला अशा प्रकारे डावलने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रुचले नाही.
अजित नाईकवाडे यांना अमित देशमुखांचा फोन
अजित नाईकवाडे हे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असून वडिलांपासून ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जोरदार तयारी केली होती. एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. यापूर्वी नगरसेवक निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या भल्याभल्या उमेदवारांना धुळ चारली आहे.
उमेदवारी डावल्याने नाराज असल्याचे पाहून त्यांच्या निवासस्थानी डॉ. शिवाजी काळगे, निरीक्षक विजय देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यासह शेकडो कार्यकर्ते मनधरणीसाठी तळ ठोकून होते. दरम्यान, माजी मंत्री अमित देशमुख यानीही नाईकवाडे यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. नाईकवाडे त्यांचा उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी प्रभागातही दाखल करण्यात आल्याने तो अर्ज ठेवणार की काढणार? याकडे आता लक्ष लागले आहे.


