राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलंय.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम झाले. आधी मविआमधील पक्षांतील नेते फोडणारी महायुती आपल्या गटातील पक्षात फोडाफोडी करू लागलेत. नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलीय. त्याआधी झालेल्या पक्ष प्रवेशांवरून शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटलाय. नेते पळवण्यावरून मुख्यमंत्री संतापले आहेत.
नेहमी शांत राहणारे, विरोधकांनी जहरी टीका केली तरी त्याला शांतपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री फडणवीस भर बैठकीत संतापल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या संतापाचं कारण होतं, शिंदे सेनेच्या नेत्यांनी कॅबिनेटला मारलेली दांडी. आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही शिवसेनेचा मंत्री उपस्थित नव्हता. यामागे नेमकं कारण काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने अघोषित बहिष्कार टाकला. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाचे प्री कॅबिनेट होत असते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. पण राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे नेत्यांनी दांडी मारली. त्यावरून मुख्यमंत्र्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी भरबैठकीत नेत्यांवर संतापले.
भाजपकडून युतीचा धर्म पाळला जात नाहीये. भाजप शिवसेनेचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत. तसेच शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात, तसेच निधी देखील वळवला जातोय, या कारणांमुळे शिंदे सेनेच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सुनावलं असल्याचं म्हटलं जात आहे.
भाजपच्या ऑपरेशन लोट्स मुळेच शिवसेनेचे नेते नाराज आहेत. मात्र त्यावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांनाच जाब विचारला. युती धर्मावरून भाजपला प्रश्न केला जात असताना मुख्यमंत्री सुनावलं. उल्हासनगरमध्ये आधी तुम्ही सुरुवात केली. तुम्ही करणार असला तर ते चालवून घ्यायचं का? पण भाजपनं केलं तर खपवून घ्यायचं नाही, हे चालणार नाही असं फडणवीस म्हणालेत.


