राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी (17 नोव्हेंबर) संपली असून आजपासून (18 नोव्हेंबर) नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी होईल आणि वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
मात्र त्याआधीच महायुतीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे भाजपामध्ये इनकमिंग सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेना शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी सामूहिक दांडी मारून निषेध केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणीही मंत्री नाराज नाही. एकनाथ शिंदे स्वत: बैठकीला हजर होते. निवडणुकीच्या कामामुळे आज भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे-जिथे प्रभारी आहेत, तिथे-तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्याठिकाणी उपस्थित आहेत. आज भाजपाचेच जवळपास 8 मंत्री आपापल्या जिल्ह्यात आहेत, तसेच शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे देखील आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची संख्या थोडी कमी होती. दुसऱ्या कोणत्याही विषयामुळे कोणीही अनुपस्थित नाही, असे कारण बावनकुळे यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे असेही म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी असल्यामुळे त्या-त्या जिल्ह्यात उपस्थित राहण्यासाठी स्वत: मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे मंत्रिसुद्धा आपापल्या भागात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या कमी होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे बैठकीला होतो. आताही बैठक सुरूच आहे. परंतु माध्यमांमध्ये जो काही अंदाज बांधला जात आहे, तो चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर दिले
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शिवसेना शिंदे गटातील काही जणांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. यानंतर एकनाथ शिंदे फक्त बैठकीला गेले आणि शिवसेनेतील सर्व मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात बसून होते, असा प्रश्नही बावनकुळेंना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मला वाटत नाही असे काही असेल. यात चुकीचा समज झाला आहे. कारण आमच्यात कुठेही नाराजी नाही. महायुतीमध्ये हे ठरलं आहे की, कोणताही नेता एकमेकांच्या पक्षात जाणार नाही. पण, मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या.
काही भाजपामधून एकनाथ शिंदेंकडे गेले आणि काही अजित पवारांचे आमच्याकडे आले. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते एकत्र बसून याबद्दलचा निर्णय घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हे कारण नव्हते, असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र त्याचवेळी गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.


