बांगलादेशाचे राजकारण पुन्हा एकदा उकळायला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना दिल्लीतून राजकीय हालचालींना वेग देत आहेत. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला ‘राजकीय संधी’ बनवून पुन्हा एकदा अवामी लीगला रस्त्यावर आणण्याचा त्यांचा मोठा डाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एक नाव अचानक देशातील चर्चेचा विषय बनले आहे सलीना हयात आयव्ही, अवामी लीगच्या आघाडीच्या नेत्या, ज्यांना आगामी हंगामी अध्यक्ष म्हणून पुढे केले जात आहे. आणि त्या सध्या तुरुंगात आहेत!
अवामी लीग पुढील नेतृत्वासाठी सज्ज : सलीना हयात प्रमुख दावेदार
बांगलादेशच्या प्रमुख वृत्तपत्र कालेर कथाच्या माहितीनुसार, अवामी लीग अतिशय लवकर नवीन कार्यकारी अध्यक्षाची घोषणा करू शकते. पक्षावर सरकारने घातलेल्या निर्बंधांना उत्तर देण्यासाठी आणि रस्त्यावर पुन्हा संघर्ष पेटवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले जात आहे. या पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सलीना हयात आयव्ही नारायणगंजच्या माजी महापौर, शेख हसीनांच्या अतिशय विश्वासू सहकारी आणि सध्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करत तुरुंगात असलेल्या आघाडीच्या नेत्या. जुलैच्या आंदोलनात अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे सलीना आयव्ही यांना तुरुंगात डांबले गेले. ढाका उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला असला तरी त्यांची सुटका अद्याप रोखून ठेवण्यात आली आहे. तरीही, त्यांचे नाव अवामी लीगच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी चर्चेत येत असल्याने बांगलादेशी राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली आहे.
हसीना यांची मोठी राजकीय रणनीती
शेख हसीना शिक्षेनंतर शांत बसलेल्या नाहीत. उलट त्या या निर्णयाचा वापर करून समर्थकांना संघटित करत आहेत. त्यांचा स्पष्ट संदेश
अवामी लीगला कोणीही दडपू शकत नाही. हा संदेश सरकारविरोधी मोर्चाला पुन्हा प्रोत्साहन देतोय. हसीनांच्या नेतृत्वाखालील टीम दिल्लीहूनच ढाक्यातील आंदोलनाची रणनीती आखत आहे. रस्त्यावर उतरलेल्या अवामी लीग कार्यकर्त्यांवर कारवाईचा जोर वाढत असून, दोन दिवसांत 1,600 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तरीही गोपालगंज, गाजीपूर, मैमनसिंग रोड इत्यादी भागांत कार्यकर्ते उच्चस्तरीय सक्रिय आहेत.
सलीना नाही तर, इतर कोण?
जर सलीना हयात आयव्ही बाहेर आल्या आणि नेतृत्व स्विकारले, तर बांगलादेशात सत्तापालटाची स्थिती आणखी जलद होऊ शकते.
परंतु, त्यांच्याऐवजी दोन नावेही जोरात आहेत,
माजी सभापती शिरीन शर्मीन चौधरी
माजी खासदार साबीर हुसेन चौधरी
हसीनांचा मुलगा : सरकार पाडण्याचे संकेत
लंडनमध्ये राहणारे साजिद वाजिद, हसीनांचे पुत्र, यांनी 18 ऑक्टोबरला दिलेल्या निवेदनाने बांगलादेशात राजकीय वातावरण तापवले.
त्यांचे शब्द माझ्या आईला राजकीय योजनेनुसार दोषी ठरवले गेले आहे. आम्हाला निकाल आधीच माहीत होता. आता आम्ही बांगलादेशात परत येणार आहोत… आणि हे सरकार पाडणार आहोत. साजिद यांना हसीनांचे भावी राजकीय वारस मानले जाते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने अवामी लीग समर्थकांना नव्या उमेदीने पेटवले आहे.
युनूस सरकारची कठोर भूमिका
मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अवामी लीगवर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय राजकीय संघर्षाला टोकावर नेणारा मानला जात आहे. अवामी लीग मात्र स्पष्ट म्हणते, हा संघर्ष आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, आणि आम्ही रस्त्यावर उतरून त्याला उत्तर देऊ !


