दोन्हीकडे पवार संस्कारितांची भांडणे उघड्यावर…
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर आली, पण या दोन्हीकडे “पवार संस्कारितांनीच” आपली भांडणे उघड्यावर आणली. त्यामुळे पवारांच्या संस्कारांनी दादागिरी पासून ड्रग्स प्रकरणापर्यंत सगळीकडे कसा धुमाकूळ घातलाय, हेच राजकीय चित्र महाराष्ट्राला दिसले.
– अनगरकर पाटलांची दादागिरी
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक “पवार संस्कारितांच्या” भांडणामुळे गाजली. सगळे राजकीय आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढून भाजपमध्ये आलेल्या राजन पाटील अनगरकरांनी दादागिरी करून अनगरची नगरपंचायत बिनविरोध निवडून आणली, पण त्यांना नगराध्यक्ष पदासाठी जेव्हा आव्हान मिळाले, तेव्हा साम-दाम दंड भेद वापरून विरोधी उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्जच त्यांनी बाद करून घेतला. अनगरकर पाटलांच्या मुलाने अजित पवारांचा उल्लेख एकेरीत करून कोणाचा पण नाद करा, पण अनगरकरांचा नाद करू नका, अशी दमबाजी केली. बाळराजे पाटलाला त्याच्या त्याच दमदाटीच्या भाषेत उमेश पाटील, अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण या दोघांनी प्रति दमदाटी करून उत्तर दिले. त्यामुळे “पवार संस्कारितांची” दादागिरीची संस्कृती सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आली.
– सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना पत्र
पण एवढ्यावरच हे सगळे प्रकरण थांबले नाही. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे ड्रग्स प्रकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा उकरून बाहेर काढले. ड्रग्स प्रकरणातले आरोपी भाजपने म्हणे आपल्या पक्षात घेतले. याविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.
– ड्रग्स मधला आरोपी पवारांच्याच राष्ट्रवादीचा
पण ज्या आरोपीला भाजपमध्ये घेतले गेले, तो आरोपी तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच होता. त्याने राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. तो प्रवेश राणा जगजीत सिंह पाटलांनी करून घेतला, हे सत्य मात्र सुप्रिया सुळे यांनी लपविले. हे सत्य सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचेच नातेवाईक भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी उघड्यावर आणले. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले त्याचे उत्तर फडणवीसांनी दिले नाही तर ते राणा जगजीत सिंह पाटलांनी दिले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना पत्राचे उत्तर लिहिले त्या उत्तरातच ड्रग्स प्रकरणातला आरोपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तुळजापूरचा शहराध्यक्ष होता हे राजकीय सत्य त्यांनी उघडकीस आणले.
सुप्रिया सुळे यांना लिहिलेल्या पत्रात राणा जगजीत सिंह पाटलांनी मुंबईतल्या हॉस्पिटलच्या निविदेचा विषय सुद्धा आणला. ते हॉस्पिटल चालवण्याच्या दोन वेळा निविदा काढल्या, त्यावेळी त्या भरायला कुणी पुढे आले नव्हते. तिसऱ्यांदा जेव्हा निविदा काढल्या, तेव्हा तेरणा ट्रस्टने त्यात भाग घेतल्याचा दावा राणा जगजीत सिंह पाटलांनी केला.
– राणा जगजीत सिंह पवार संस्कारितच
राणा जगजीत सिंह हे आज जरी भाजपचे आमदार असले तरी ते सुद्धा मूळचे पवार संस्कारितच. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार होते. राणा जगजीत सिंह यांचे वडील पद्मसिंह पाटील शरद पवारांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. शिवाय ते पवारांचे नातेवाईक आहे कारण सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटलांच्या सख्ख्या बहीण आहेत. त्यामुळे ड्रग्स प्रकरणातला आरोपी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेणे हा सगळा पवारांच्या घरातलाच मामला आहे. तो आत्तापर्यंत दबून होता, पण सुप्रिया सुळे आणि जगजीत सिंह पाटील यांच्या पत्रापत्रीमुळे तो महाराष्ट्रासमोर उघड्यावर आला.


