अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा…
भारत-पाकिस्तानमधील मे २०२५ चा तणावपूर्ण संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन (USCC) च्या नव्या अहवालात असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की चीनने या संघर्षाचा वापर आपल्या प्रगत शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष युद्धभूमीवर चाचणी घेण्यासाठी केला. केवळ चाचणीच नव्हे, तर या निकालांचा अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने प्रचार करून चीनने मुस्लिम देशांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा करण्यात आला आहे.
चीनचा ‘रिअल वॉर फिल्ड’ प्रयोग
अहवालानुसार, 7 ते 10 मे 2025 दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने पाकिस्तानच्या सहकार्याने आपल्या अनेक आधुनिक शस्त्रांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धात चाचणी घेतली.
यामध्ये प्रमुखत्वाने,
HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली
PL-15 हवेतून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र
J-10C हे अत्याधुनिक लढाऊ विमान
या प्रणालींचा पाकिस्तानच्या तैनातीद्वारे प्रत्यक्ष वापर करण्यात आला.
USCC अहवालात नमूद केल्याप्रमाणे, हा संपूर्ण संघर्ष चीनसाठी ‘लॅब टेस्ट’ किंवा ‘फिल्ड एक्सपेरिमेंट’सारखा उपयोग करण्यात आला. युद्धात शस्त्रे कशी काम करतात, किती अचूकता मिळते आणि पाश्चात्य देशांच्या तंत्रज्ञानाशी तुलनात्मक प्रभाव काय आहे, याचा अभ्यास बीजिंगने युद्धस्थितीतूनच केला.
पाकिस्तानच्या दाव्यांचा चीनकडून प्रचारासाठी वापर
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत दावा केला होता की जे-10C विमानांनी भारतीय हवाई दलाची राफेलसह अनेक विमाने पाडली. अहवालात म्हटले आहे की हे दावे अतिशयोक्तीपूर्ण असण्याची शक्यता आहे. परंतु, चीनने या दाव्यांना जगभरात फिरवून आपली शस्त्रे पाश्चात्य तंत्रज्ञानापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे चित्र उभे केले. चीनमधील दूतावासांनी विविध मुस्लिम देशांमध्ये या दाव्यांचे आक्रमकपणे मार्केटिंग केले, ज्यामुळे चीनच्या शस्त्रविक्रीला कृत्रिम बळ मिळाले.
एआय प्रतिमा, व्हिडिओ गेम ग्राफिक्स आणि चुकीच्या माहितीचे जाळे
USCC च्या आरोपांनुसार, चीनने सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स तयार करून अनेक एआय-जनरेटेड प्रतिमा प्रसारित केल्या.
या प्रतिमांमध्ये
भारतीय विमानांचे कथित अवशेष
राफेल विमाने “अपयशी” ठरल्याचे दृश्य
जे-35 या चिनी लढाऊ विमानाचा “विजय” दाखवणारे ग्राफिक्स
यांचा समावेश होता.
अहवालानुसार, फ्रेंच गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले की चीनच्या चुकीच्या माहिती मोहिमेनंतर इंडोनेशियाने राफेल खरेदी प्रक्रियेवर विराम दिला. हा भाग जागतिक स्तरावरील चिनी माहिती युद्ध किती सक्रिय आणि प्रभावी आहे, याचे उदाहरण मानला जातो.
पाकिस्तानचे चिनी शस्त्रांवर वाढते अवलंबित्व
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानच्या एकूण शस्त्रास्त्र आयातीपैकी तब्बल ८१ टक्के आयात चीनकडून झाली आहे.
जून 2025 मध्ये चीनने पाकिस्तानला,
४० J-35 लढाऊ विमाने
KJ-500 हवाई चेतावणी प्रणाली
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली
विकण्याची ऑफर दिली असल्याचेही अहवालात नमूद आहे.


