आमदार नसलेल्या नेत्यालाही मंत्रिपदाची शपथ; आश्चर्यकारक निर्णय…
विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर कब्जा केल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची नितीश कुमार यांनी दहाव्यांदा शपथ घेत इतिहास घडवला. त्यांच्यासोबत 26 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
पण हा शपथविधी अनेक अर्थांनी चर्चेचाही ठरला आहे. जातीय समीकरणांसोबत घराणेशाहीचा छापही शपथविधीवर उमटली आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आमदार नसलेला नेताही असणार आहे.
‘एनडीए’मध्ये भाजप आणि जेडीयूसह लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांचाही समावेश आहे. सर्व पक्षांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याने या पक्षाच्या आमदारांनाही अपेक्षित स्थान देण्यात आले आहे. पण हे करत असताना नितीश कुमार व भाजप नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागल्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीश कुमार हे नेहमीच घराणेशाहीच्या विरोधात राहिले आहेत. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांनी आपल्या लेकाला कधी विधिमंडळाची पायरी चढू दिली नाही. भाजपसह त्यांनी लालूप्रसाद यादव यांना घराणेशाहीवरून जोरदार टीका केली होती. पण आता मंत्रिमंडळामध्ये त्यांना घराणेशाही पोसावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आमदार नसलेल्या एका नेत्यालाही मंत्रिपदाची शपथ देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. ते कोणत्याही सभागृहाचे आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत निवडून आणले जाईल. विशेष म्हणजे कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. पण त्यांना डावलून लेकाला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एनडीएतील दुसरे भागीदार असलेल्या जीतनराम मांझी यांचे पुत्रही मंत्री बनले आहेत. संतोष कुमार सुमन यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मांझी यांची सून, लेकाची सासू आणि जावईही आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे नितीन नबीन, श्रेयशी सिंह, रमा निषाद, सम्राट चौओधरी, नितीन मिश्रा, अनंत सिंह, ऋतुराज कुमार, चेन आनंद आदी आमदारांचेही थेट घराणेशाहीशी कनेक्शन आहे.
केवळ तीन महिला
नितीश कुमार यांनी निवडणुकीआधी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. मतदानावेळी महिलांनी त्यांना भरभरून मते दिल्याचे मानले जाते. मात्र, मंत्रिमंडळात महिलांना झुकते माप मिळालेले दिसत नाही. एकूण २६ मंत्र्यांमध्ये केवळ तीन महिलांना संधी देण्यात आली आहे.


