पवारसाहेबांच्या युवा नेत्याचा ‘GenZ’च्या आंदोलनाचा इशारा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री, नेते, आमदार यांच्याकडून सुरू असलेल्या वादाची मालिका थांबायला तयार नाही. मंत्र्यांनी ओढावून घेतलेल्या वादातून सावरत असतानाच, आता अहिल्यानगरच्या अकोले इथले आमदार किरण लहामटे वादात सापडले आहे.
शेतकऱ्याच्या मुस्काटात मारल्याच्या त्यांच्यावर आरोप होत असून, यावरून अकोल्यातले वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते अमित भांगरे यांनी या प्रकारावरून ‘GenZ’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अकोले तालुक्यातील लिंगदेव इथले वाळीबा होलगीर या शेतकऱ्याने (Farmer) आमदार किरण लहामटे यांनी आपल्या मुस्काटात मारल्याचा आरोप केला आहे. विजेच्या प्रश्नासंदर्भात होलगीर यांनी आमदार लहामटे यांची 15 नोव्हेंबरला भेट घेतली होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे.
शेतकऱ्याला झालेल्या या माराहणीचे तीव्र पडसाद अकोले इथंल्या लिंगदेव गावात उमटले. या मारहाणीच्या निषेधार्थ लिंगदेवमधील ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केलं. आमदारांनी शेतकऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आंदोलनात विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते अमित भांगरे यांनी, 2019 मध्ये ज्यांना आम्ही वर्गणी काढून निवडून दिले, त्यांच्या डोक्यात आता सत्ता गेली आहे. संपत्तीची मस्ती डोक्यात गेली आहे. हे असेच सुरू राहिल्यास तालुक्यात ‘GenZ’चे आंदोलन पाहायला मिळेल, असा इशारा दिला.
निवृत्त अधिकारी बी. जी. देशमुख यांनी, यापूर्वीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या काळात अशी घटना घडल्याचा पाहायला मिळाले नाही. पण तालुका अन्याय सहन करणार नाही, असा इशारा दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मारुती मेंगाळ यांनी, शेतकऱ्याला मारहाण केली म्हणून, आमदाराचा निषेध होण्याची ही घटना पहिलीच असावी, असा टोला लगावला.
कानडी समाजसंकट बबन सदगीर यांनी आमदार किरण लहामटे यांनी माफी मागितली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. दरम्यान, घटना घडून पाच दिवस झाले असून, यावर आमदार लहामटे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे घटनेचे पडसाद आता राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये उमटू लागले आहेत.


