मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर !
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरला असून मालेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
गावातील विजय संजय खैरनार (वय २४) याने आधी चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या घटनेचा राज्यभरातून निषेध नोंदविण्यात येत असून आरोपीला फाशी देण्यात यावी, त्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील अॅक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आरोपीला अटक केली असली तरी एवढ्यावर न थांबता आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे. फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही आम्ही मागणी केली आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या.
चाकणकर म्हणाल्या, लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला आधी कमी शिक्षा होती ती आता नवीन कायद्यानुसार कठोर केली आहे. याआधी झालेल्या घटनांमध्ये महिला आयोगाने पाठपुरावा केला. तीन घटनेत आरोपीला कठोर शिक्षा देण्यात आली आहे.
तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना आहे. त्या चिमुरडीला वेदना झाल्या असतील तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत, हीच सर्वांची मागणी आहे. पण त्याला कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल. मी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं काय म्हणणे आहे ते जाणून घेणार आहे. त्यांनतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
दरम्यान काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले. यावेळी, तुमची लेक ही माझी लेक आहे, तिला न्याय मिळवूनच आपण थांबू असा धीर जरांगे पाटलांनी दिला. आरोपीचा एन्काउंटर करत दोन महिन्यात खटला निकाली लावण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काल पीडित कुटुंबाची भेट घेत सात्वंन केलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यापूर्वी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती.


