भाजपाच्या पारड्यात वजनदार खाती…
बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी खातेवाटप जाहीर करण्यात आले. दोन दशकानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहखाते सोडले आहे.
उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खातेवाटपाची यादी आज राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
सम्राट चौधरी यांच्याकडे गृहखाते देण्यात आल्यामुळे मंत्रिमंडळावर भाजपाची स्पष्टपणे पकड दिसून येत आहे. दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग तर रामकृपाल यादव यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपाच्या मंत्र्यांकडे मोठी खाती असल्याचे दिसून येत आहे. गृह, आरोग्य, रस्ते बांधकाम आणि कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालये भाजपाने स्वतःजवळ ठेवली आहेत.
नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. २६ जणांच्या या मंत्रिमंडळात भाजपाचे १४, जदयूचे ९, लोजप (रामविलास) २, एचएएम आणि आरएलएम पक्षाला प्रत्येकी दोन मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत.


