महाविकास आघाडीकडे स्वत:चा उमेदवार नव्हता. नगराध्यक्षपदासाठी त्यांना भाजपचाच उमेदवार उभा करावा लागला, तिथेच महाविकास आघाडी फेल झाली,’ अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली.
भाजपच्या वतीने गुरुवारी सायंकाळी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजे, खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा पालिकेसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. ज्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत ते नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतील. रिपाइं वगळता महायुतीतील अन्य पक्ष आमच्यासोबत चर्चेला आले नाहीत. त्यामुळे आम्ही रिपाइंला एक जागा दिली.
जे अपक्ष पक्षविरोधी भूमिका घेऊन निवडणूक लढवतील, अशांवर पक्ष कारवाई करेल. पाचगणी व महाबळेश्वर वगळता अन्य सर्व ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात उमेदवार दिला आहे, याबाबत माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले, आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत, ते त्यांचा. तरीही आम्ही त्यांना विनंती करू. शेवटी निर्णय तेच घेतील. यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते, धनंजय जांभळे, अशोक मोने आदी उपस्थित होते.
म्हणून महाराष्ट्रात बदल : उदयनराजे
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्या काळात केवळ आश्वासने दिली गेली. मात्र, ती पूर्ण भाजप व मित्रपक्षाने केली. त्यामुळेच महाराष्ट्रात बदल झाला. आमच्या दोघांनाही उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न होता. ज्यांनी जनतेची सेवा केली हा निकष समोर ठेवून आम्ही उमेदवारांची निवड केली. तिकीट न मिळालेल्यांनी नाराज होऊ नये. त्यांना भाजपच्या वतीने नक्कीच योग्य तिथे संधी दिली जाईल, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली.
सुवर्णा पाटील यांनी पुन्हा यावे…
सुवर्णा पाटील या भाजपच्या माध्यमातून राज्यभरात काम करत होत्या. नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज झाल्या. ज्या महाविकास आघाडीत त्या गेल्या आहेत, तिथे त्यांना न्याय मिळणार नाही. त्यांनी भाजपसोबत यावे, अशी साद शिवेंद्रसिंहराजे यांनी घातली.
शिंदे-पवार भेटीवर मौन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, याबाबत छेडले असता शिवेंद्रसिंहराजे यांनी सावध भूमिका घेलती. ते म्हणाले, याबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी घेतील. आमचे सरकार पाच वर्षे चांगले काम करेल.


