राजकारण तापलं; नेमकं घडलं काय ?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ येताच येथे राजकीय वातावरण तापले असून, पक्षांतर आणि पक्षफोडीचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. अशातच नंदुरबारमध्ये धमकीचे प्रकरण समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
नंदुरबारमध्ये उमेदवाराला फोडण्यासाठी शिवसेना शिंदेसेनेच्या आमदाराने धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांना फोडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप भाजप नेत्या आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात आहे. कार्यकर्त्यांना दम दिला जात आहे. नंदुरबार नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अविनाश माळी यांच्यावर दबाव टाकला जात आहे’, असा गंभीर आरोप डॉ. गावित यांनी केला आहे.
डॉ. गावित यांनी असा दावा केला की, ‘नंदुरबारमधील दीर्घकाळ असलेल्या सत्तेचा कंटाळा आला असून, जनता आता बदलाची मागणी करत आहे. यामुळे भाजप उमेदवार निश्चितच विजय मिळवतील. काँग्रेस आणि शिवसेनेला पराभव जवळ दिसत आहे. यामुळे नेत्यांकडून आता दबावतंत्र वापरले जात आहे’, असंही डॉ. गावित म्हणाल्या.
आमदार रघुवंशी यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे निवडणुकीचं वातावरण अधिक तापले असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.


