राज ठाकरेंचं मोठं भाष्य !
राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. यातच काही नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.
त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय नेते मंडळी आपआपल्या कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवातून मनसैनिकांशी संवाद साधताना एक मोठं भाष्य केलं आहे. ‘येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची असेल, जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली म्हणून समजा’, असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
थोडे दिवस थांबा, आता भाषणं सुरूच होतील. आज आपल्या कोकण महोत्सवाचं ११ वं वर्ष साजरं होत आहे. या कोकण महोत्सवाला सर्वांचा आशीर्वाद लाभतो आहे. त्याबाबत सर्वांचे आभारच. मला आज फक्त एवढी एकच गोष्ट सांगायची आहे की रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे गाफील राहू नका. आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा. आता ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि मुंबईवर ज्या प्रकारे डोळा ठेवला जात आहे, मतदार याद्यांच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे, त्यावर तुम्ही लक्ष ठेवा”, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत आणि कोण मतदार खोटे आहेत, यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मी आज मराठी माणसांसाठी म्हणून एकच गोष्ट सांगतो. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली म्हणून समजा. मग त्यानंतर या लोकांचं जे थैमान सुरू होतील ते मग कोणालाही आवरता येणार नाहीत. त्यामुळे मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही कुठेही गाफील राहू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


