शहाजी बापूंच्या सांगोलातील सभेत काय म्हणाले शिंदे ?
गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सारे काही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. भाजपचे नेते आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप केले आहेत.
तर, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशामध्ये आता सांगोलामधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा सुरु आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कौतुक करताना नाव न घेता भाजपवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, “शहाजी बापू हे सांगोल्याचे जखमी शेर आहेत. जनतेच्या मनात चीड आणि आग असल्यामुळे या मतदारसंघात सगळेच मतदानासाठी बाहेर पडले तर विजय आपलाच आहे. शहाजी बापूंमुळे सांगोल्याचा विकास झाला. बापू स्वतःचे काम कधी घेऊन आले नाहीत, ते नेहमी या भागातील विकास कामेच माझ्याकडे घेऊन यायचे. विधानसभा निवडणुकीच्या काळात पुतळ्यासाठी मी विमानात बसायच्या आधी 50 लाखांचा निधी दिला होता. जीवाशी खेळून बापुंनी लोकसभेत आपल्या मतदारसंघात भाजपला लीड दिले होते. बापू तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या मित्र पक्षांनी तुमचा गेम केला आहे, तर मी तुमच्या पाठिशी उभा आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.
भाजपने आपल्याला एकटे पाडले, विश्वासघात केल्याचा आरोप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला होता. त्यानंतरही ते म्हणाले होते की, “लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भापजच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिले. पण, विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली,” असा गंभीर आरोप केला. दरम्यान, सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केले आहे. त्यामुळे, शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत.


