उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडक्या बहिणींना आणखी कोणती भेट ?
मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री, माझी ओळख कार्यकर्ता अशीच असली, तरी माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं लाडका भाऊ, हे माझं सर्वात मोठं पद आहे” अशा भावनिक शब्दांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळनेरकरांवर मोहिनी घातली
पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता स्पष्ट वेग आला असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. सभेची सुरुवात त्यांनी अहिराणी भाषेत करताच वातावरणात आपुलकीची लहर निर्माण झाली. “लाडक्या बहिणींचा आवाज जरा कमी आहे. दोन तारखेपर्यंत तो वाढला पाहिजे,” या शब्दांत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले. सभेत शिंदे यांनी पिंपळनेर शहराच्या
पुढील विकासासाठी काही महत्त्वाच्या घोषणांचा उल्लेख केला.
यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, आ. मंजुळा गावीत, जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत,जिल्हा प्रमुख सतीश महाले, हिलाल माळी, विशाल दिसले यांच्यासह नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.
शहरात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी अत्याधुनिक शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी खास निधी देऊन सुधारणा कामे जलद गतीने करण्याची माहिती दिली. अनियमित घरांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव मंजूर केले जातील, असे त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत, जॉगिंग ट्रॅक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, पिंपळनेरच्या कुस्ती परंपरेचा विशेष उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, येथे दर्जेदार आखाडा उभारला जाईल. “कुस्तीचा आखाडा तातडीने सुरू करण्यासाठी मी चंद्रहार पाटील यांना पाठवतो,” असे त्यांनी सांगितले.
नगर विकास विभागाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण उभारणीसाठी सातत्याने मदत मिळेल, याची त्यांनी हमी दिली. राज्यातील योजनांबाबत सांगताना शिंदे म्हणाले की, साडेचारशे कोटी रुपयांचा लाभ सुमारे ७० हजार नागरिकांना मिळाला आणि अनेकांच्या जीविताचे रक्षण झाले. दारी योजना थेट चार कोटी लोकांपर्यंत पोहोचली. महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमांतर्गत तीन कोटी तपासण्या मोफत झाल्या आणि अकरा हजारांहून अधिक महिलांचे गंभीर विकार प्रारंभीच निदान झाले, याचीही त्यांनी माहिती दिली.
शिंदे म्हणाले, नागरिकांनी आमदार मंजुळा गावित यांना दोन वेळा निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. दोन तारखेच्या मतदानापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत करावी, असे त्यांनी सांगितले. “मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री, माझी ओळख कार्यकर्ताचीच आहे,” असे ते म्हणाले. सत्ता येते-जाते, परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण जपणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझं सर्वात मोठं पद म्हणजे लाडका भाऊ,” या भावनिक शब्दांनी त्यांनी भाषणाची सांगता केली. उपमुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे पिंपळनेरमध्ये निवडणूक वातावरण आणखी उत्साही झाल्याचे दिसून आले.


