CM फडणवीसांचे आश्वासन…
मुंबईत आता सुरू असलेली कामे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी हैं. पुढील ५ ते ७ वर्षांत मुंबईचा कायापालट होणार आहे. हे केवळ बोलण्यापुरते नाही, मी कोस्टल रोड, अटल सेतु याबाबत सांगायचो, तेव्हा माझी थट्टा केली जायची.
पण उत्तर ते दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटी प्रत्येक बाजूने चांगली होणार आहे. कोस्टल रोड सी लिंकपर्यंत आला आहे. आता वांद्रे ते वर्सोवा आमच्या सी लिंकचे काम सुरू आहे. चार ठिकाणी याला कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर अशा आणखी एका लिंकचे काम आम्ही सुरू केले आहे. एक प्रकारे आम्ही समांतर रस्ते कनेक्टिव्हिटी तयार करत आहोत. त्या रस्त्यावर वाहने ८० किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लोकल ट्रेनबाबत मोठे विधान केले. मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात. लोकलमध्ये इतकी गर्दी असते की, खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेशही करू शकत नाही. या लोकलचा विकास करणे आवश्यक आहे. आम्ही विचार केला की, सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणे आवश्यक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
द्वितीय श्रेणीचे तिकीट एक रुपयाने वाढवणार नाही
आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित करत आहोत. तसेच या लोकलचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे कोणालाही लोंबकळत प्रवास करावा लागणार नाही. इथे एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही मेट्रो इतकीच सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार आहोत. मात्र, ते करत असताना द्वितीय श्रेणीचे तिकीट एक रुपयाने वाढवणार नाही. आत्ताचा जो तिकीट दर आहे त्याच दराने आम्ही मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचे तिकीट देणार आहोत, असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुधारणा करण्यात येणार आहे. जगातील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीपैकी एक असलेल्या मुंबई लोकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला जाणार आहे, असे म्हटले जात आहे.


