सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या शपथविधीनंतरची कृती चर्चेत !
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी २४ नोव्हेंबर रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.
मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (२३ नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला भूषण गवई हे देखील उपस्थित होते.
भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर एक नवा आदर्श ठेवला आहे. गवई यांनी निवृत्त होताच लगेचच सर्व सरकारी सुविधा सोडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेताच भूषण गवई यांनी त्यांची अधिकृत शासकीय कार लगेच तिथेच सोडली आणि एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. भूषण गवई हे शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात त्यांच्या अधिकृत गाडीने दाखल झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा परत जाताना गवई हे त्यांच्या वैयक्तिक वाहनाने परतले. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
शपथविधी समारंभानंतर गवई यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासाठी राखीव अधिकृत वाहन सोडल्याचं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे भूषण गवई यांची ही कृती चर्चेत आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भूषण गवई यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की निवृत्तीनंतर ते कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाहीत.
न्यायमूर्ती सूर्य कांत सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे पुढील १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सूर्य कांत यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला आहे. कारण या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील. तब्बल १५ महिने त्यांच्याकडे हे पद असेल.
न्यायमूर्ती सूर्य कांत कोण आहेत?
सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९८१ साली त्यांनी हिसार येथील शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि हिसार येथील जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. त्यानंतर १९८५ मध्ये ते पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी चंदीगडला गेले. तिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले.
९ जानेवारी २००४ रोजी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१८ ते मे २०१९ पर्यंत न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत आणि आता ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीशी झाले आहेत.


