ते प्रश्न उपस्थित करत थेट म्हणाल्या…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगत आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळीकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो, प्रचार सभा घेतल्या जात आहेत.
या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने स्थानिक नेत्यांवर निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली असून, अजित पवार स्वतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात जाऊन सभा घेत आहेत. काल सोमवारी त्यांची परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला आता मंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील बडे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेले असली तरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार स्वतः दौरे करताना दिसत आहेत. जिंतूरमधील सभेत अजित पवार यांनी जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धरतीवर करू, हा विकास करणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नसल्याची टीका भाजप नेत्या तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर केली होती. या टीकेला भाजच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
मंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रत्युत्तर
कायम सत्ता केंद्र हे बारामतीत राहिले आहे. अजित दादांनी बारामतीला दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिलेला आहे. त्यामुळे बारामतीचा विकास होणारच ना, असाच विकास इतर नगर पालिकांचा का झाला नाही? जिंतूर नगरपरिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता होती मग जर अजित पवारांनी निधी दिला ही असेल तर यांनी तो निधी घरी ठेवला होता का? असे सवाल मंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केले आहेत.
सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतल्या. या सभेतून अजित पवार यांनी मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो असे म्हटले होते. बीड जिल्ह्यातील आयोजित करण्यात आलेल्या सभेतून देखील अजित पवार यांनी नेत्यांवर हल्लाबोल केला होता.


