भाजप पक्ष प्रवेशामुळेच…
कागलमध्ये समरजीत घाटगे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ एकत्र आल्यानंतर घाटगे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. या युतीनंतरही घाटगे यांनी भाजपच्या पक्षप्रवेशा संदर्भात बोलणे टाळले आहे.
मात्र हे गुपित लपवणाऱ्या घाटगे यांचे बिंग राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी फोडले आहे. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचे संकेत त्यांनी देत दोघांमधील युती कोणत्या कारणाने झाली? याचे कारण स्पष्ट केले आहे. कागलचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे.
भाजपचे एकही उमेदवार स्वतंत्र उभा राहता कामा नये, याची खबरदारी घ्या अशा सूचना त्यांच्याकडून आल्या होत्या. वरिष्ठांचा आदेश आम्हाला मानावा लागतो. भविष्यातील काही गोष्टींचा विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कदाचित समरजीत घाटगे हे भाजपमध्ये येणार असतील, यावेत यामुळे हा मोठा निर्णय घेतला असावा.
मात्र नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी देऊ, अशा शब्दात राज्यसभेची खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. वरिष्ठच्या सूचनेनुसार आम्ही ठिकाणी महायुती म्हणून लढत आहोत. एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढतीचे ठरले आहे. पण कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी नेत्यांना काही भूमिका घ्यावी लागते.
निवडणुकीनंतर सर्वजण एकत्र फिरताना दिसतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील जे काही बोललेत ते रास्त आहे. अर्थमंत्री पवार असल्याने तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री भाजपचे असल्याने दादा देखील बोलले असतील. दोघेही त्यांच्या ठिकाणी योग्य असल्याचा निर्वाळा खासदार महाडिक यांनी दिला.
कोल्हापुरात 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. महायुतीकडून भाजप 4, जनसुराज्य 4, ताराराणी आघाडी 2, तर एक ठिकाणी भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवत आहे.13 पैकी 11 ठिकाणी हि निवडणूक लढवत आहोत. नगरपालिका, नगरपंचायतच्या 263 पैकी 87 ठिकाणी भाजप, 41 ताराराणी, 42 जनसुराज्य, तर 12 ठिकाणी जनसंघर्ष आघाडी निवडणूक लढवत आहे. असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलं.
सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी माझा पाठपुरावा सुरु आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत, जिथं आघाडी झाली तिथे आमचेच लोक आहेत. कोल्हापुरात 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल. महाविकास आघाडीचा प्रभाव कमी झालेला आहे.
असा टोला महाडिक यांनी लगावला. यानंतर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो. त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे, पक्षाची जबाबदारी म्हणून आम्ही देखील घेतली आहे.
आगामी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्ताने अनेक मंत्री कोल्हापुरात प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी चंदगड मध्ये सभा आहे.येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सभा घेणार आहेत. मंत्री पंकजाताई मुंडे या देखील प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत.


