स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत बेबनाव असल्याचे बोलले जात होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जात महाराष्ट्र भाजपाच्या धोरणाविषयी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जात होते.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाने दाखवलेल्या नाराजीनंतर आता मित्रपक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे महायुतीत ठरवण्यात आले आहे. शिवसेनेच्या याच नाराजीवर आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिल्लीत अमित शाहांसोबत नेमकी काय चर्चा झाली, राज्यात महायुतीमध्ये नेमकं काय ठरलं, याबाबत सविस्तर माहिती दिली.
मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता प्रचार
शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी महायुतीतील कथित नाराजीनाट्यावरही भाष्य केलं. मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने, विकासात्मक प्रचार करायचा, असं आम्ही ठरवलेलं आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रवेश करणारे भाजपातील तर नाहीत ना रे बाबा
शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांचा होत असलेला भाजपा प्रवेश यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. काही ठिकाणी समीकरणं पाहता मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आपण मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊ नये. मीदेखील महायुतीत मतभेद निर्माण होतील, असे काहीही करू नये, असे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय अशी माहिती शिंदे यांनी दिली. एका ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यामुळे हे प्रवेश करणारे भाजपातील तर नाहीत ना रे बाबा, असे आवर्जुन विचारले. मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही, असे माझ्या पक्षाच्या लोकांना सांगितल्याचे शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले.
म्हणून मी दिल्लीला गेलो होतो
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भाजपाच्या धोरणाबाबत तक्रार केली होती. या भेटीवरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत जाऊन तक्रार केली, असा काही विषय नव्हता. तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही. मला बिहारमधील शपथविधीसाठी बोलवण्यात आले होते. त्यासाठी मी दिल्लीला गेलो. त्यानंतर बिहारला गेलो होतो. आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत. स्थानिक पातळीवरचे विषय मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सोडवतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


