इतकी घमेंड करु नका !
दक्षिण आफ्रिकेच्या टीमने भारत दौऱ्यात दमदार प्रदर्शन केलं. त्यांनी ही कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.
पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे कोच शुकरी कॉनराड यांच्या एका स्टेटमेंटवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांनी वादग्रस्त स्टेटमेंट दिलय. कॉनराड यांच्यावर या विधानासाठी चहूबाजूंनी टीका होत आहे. गुवाहाटी टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या कोचने भारतीय टीमबद्दल असा शब्द वापरला, ज्याचा क्रिकेटमध्ये वादग्रस्त इतिहास आहे. कॉनराड यांना या वक्तव्यासाठी भारतीय दिग्गज अनिल कुंबळेने सुनावलं आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉनराड यांनी ग्रोवेल या इंग्रजी शब्दाचा वापर केला. याचा अर्थ होतो,’असहाय्य होऊन याचना करणं’
गुवाहाटी टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव 260 धावांवर घोषित केला. टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांच आव्हान होतं. त्यानंतर पत्रकार परिषदेत कॉनराड यांना डाव घोषित करायला विलंब का झाला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना वादग्रस्त स्टेटमेंट केलं. ‘आम्हाला टीम इंडियाला थकवायचं होतं. गुडघ्यावर आणायचं होतं’ त्यावेळी त्यांनी ग्रोवेल हे इंग्रजी शब्द उच्चारले.
तेव्हा शब्दांची निवड महत्वाची असते
कॉनराड यांना या शब्दासाठी टीकेचा सामना करावा लागतोय. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी भारताचे महान दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी कॉनराड यांना एक सल्ला दिला आहे. ‘इतकी घमेंड करुन नका, विनम्र रहा’ असा सल्ला कुंबळे यांनी कॉनराडना दिला आहे. ग्रोवेल या शब्दाचा एक इतिहास आहे. 50 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या कॅप्टनने वेस्ट इंडिजमध्ये हे शब्द वापरले होते. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका आता जिंकली आहे. पण जेव्हा तुम्ही टॉप स्थानावर असता, तेव्हा शब्दांची निवड महत्वाची असते. अशावेळी विनम्रता महत्वाची असते.
डेल स्टेन या शब्दांसाठी नाराजी व्यक्त करताना काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांनी सुद्धा आपल्या देशाच्या कोचच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. “मी याचं समर्थन करु शकत नाही. त्यांचा अंदाज टोनी ग्रेग यांच्यासारखा कठोर नव्हता. पण त्याला महत्व नाही. तुम्ही अशा शब्दांचा वापर करु शकत नाही. हे खूप निराशाजनक आहे. सॉरी शुकरी पण हे खूप निराशाजनक आहे अशा शब्दात डेल स्टेनने नाराजी व्यक्त केली.


