गाड्या तपासल्या, नोटीस पाठवली; संतोष बांगरांनी सगळं सांगितलं…
नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमधील मित्रच एकमेकांचे विरोधक झाल्येच चित्र आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी नाव न घेता भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले.
मुटकुळे यांनी मध्यरात्री आपल्या घरी 100 पोलिस पाठवले, आपल्या घराची झडती घेण्यात आली, असे त्यांनी म्हटले.
संतोष बांगर पुढे बोलताना म्हणाले की, ‘परवा दिवशी घराच्या समोर छावणीचं रुप आलं होतं. मी घराच्या समोरून खिडकी उघडून बघतोय तर खाली पोलिसवालेच, पोलिसवाले. मी त्यांना विचारले तर ते म्हणाले आम्हाला पंचनामा करायचा आहे, आम्हाला आदेश आहेत.’
‘कोणी तरी खालच्या स्तरावर जायचं आणि वरून पोलिस प्रशासनावर दबाव आणायचा हे योग्य नाही. जर आमदाराच्या घराची कोणी झडती घेत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार?निव्वळ दादागिरी या ठिकाणी चालली आहे. हे कुठतरी थांबलं पाहिजे.’, असे देखील त्यांनी सांगितले.
‘हिंगोलीच्या जनेतेने दाखवून दिलं की येणाऱ्या दोन तारखेला आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत. याचीच पावती म्हणून घराची चेकींग, गाड्या तपासणे, आमच्या भाच्याला, पुतण्याला 110 च्या नोटीस पाठवणे, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवणे हे सुरू आहे. स्थानिक नेते भयंकर त्रास देण्याचा काम करत आहेत, असे देखील बांगर यांनी सांगितले.
राजकारण करत असताना स्वच्छ राजकारण करा. तुम्ही तुमचे काम दाखवा आणि लोकांपर्यंत पोहोचा. पुन्हा एकदा सांगायचे आहे की साहेब तुम्ही आमच्यावर अत्याचार करताय. पण दोन तारखेला जनता याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही.’, असे म्हणत बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांना आव्हान दिले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी वातावरण पेटले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 28 नोव्हेंबरला हिंगोलीत सभा होत आहे. त्याआधी संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यावर त्यांनीच आपल्या घरी मध्यरात्री मुलं बाळ झोपले असताना पोलिस सर्च वॉरंट घेऊन पाठवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आपल्या घरातील कपडे, फ्रीज देखील उचकटून पाहिल्याचे त्यांनी म्हटले.


