आज थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवरच राणे तुटून पडले; कसले हे राजकारण म्हणत धु धु धूतलं…
मालवण पालिका निवडणुकीच्या आधीच येथे आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले आहे. येथे भाजपने प्रचार सभा घेतल्यानंतर मतदारांना वाटप करण्यासाठी पैशांच्या बॅगाच बॅगा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उतरवल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला. या आरोपाने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून दिली आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत आणखी गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतच मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्याचप्रमाणे मालवण पालिकेच्या निवडणुकीतही असेच चित्र पाहायला मिळत आहे. येथे देखील भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. पण आता त्याच आधी रवींद्र चव्हाण यांनी मालवणमध्ये प्रचार सभा घेतली आणि त्यामुळे निलेश राणेंच्या मनात संशय निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
संशय आल्यावर त्यांनी भाजपच्या जिल्हास्तरावरील एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरातील एका खोलीत पैशांनी भरलेली पिशवी आढळली. त्या ठिकाणी कुडाळ येथील भाजपचे बंड्या सावंत तसेच आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. याबाबत राणे यांनी सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करत पोलिस प्रशासन व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते आणि यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
या प्रकारामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच भाजपच्या त्या पदाधिकाऱ्याने मात्र हे पैसे आपल्या व्यावसायिक कामाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. पण निलेश राणे यांनी वीस ते पंचवीस लाख रुपयांची रक्कम असल्याचा दावा करत ती निवडणुकीत मतदारांना वाटप करण्यासाठीच आणल्याचा आरोप केला आहे. तसेच ही रक्कम रवींद्र चव्हाण यांनीच यंत्रणा लावून मालवणमध्ये आणली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यावेळी राणे म्हणाले, “मी अनेक दिवसांपासून पाहतोय की रवींद्र चव्हाण जेंव्हा जेंव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा ते वेगळंच वातावरण निर्माण करून जातात. कालही ते मालवणमध्ये आले आणि त्यानंतरच मला संशय आला. ते येथे सहज आल्यासारखे वाटत नव्हते. म्हणूनच त्या पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली आणि काय समोर आले ते सर्वांना दिसले. येथे रोज दोन-दोन, तीन-तीन बॅगा या घरासह इतर ठिकाणी उतरवल्या जात आहेत. येथूनच त्या पैशांची विभागणी होते आणि कार्यकर्ते तिथून पैसे घेऊन जातात. भाजपवाले अशा पद्धतीने निवडणुका घेणार आहेत का? आज पैसे वाटतील आणि उद्या काम न करता फक्त वसूली करतील. येथे लोकसंख्या किती आणि हे पैसे किती वाटत आहेत? अशी संस्कृती कोकणात कधीच नव्हती.
पण आता बाहेरून येऊन काही लोक असे प्रकार करत आहेत आणि येथील वातावरण गढूळ करत आहेत. हे आता थांबायलाच हवे. म्हणूनच हा प्रयोग केला. जेव्हा हे सर्व समोर आले, तेव्हा मी भाजपचे जाणते कार्यकर्ते किनवटे यांनाही बोलावले आणि हे चुकीचे असल्याचे सांगितले. बंड्या सावंत जे थेट स्पॉटवर सापडले त्यांनाही मी सांगितले की हे चुकीचे आहे. पण हे कधी थांबणार? इतक्या छोट्या पालिकेसाठी इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची गरजच काय? मी मागील काही दिवसांपासून हेच सांगत होतो आणि आता ते उघड झाले आहे, असेही राणे म्हणाले.
आम्ही विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवत आहोत. पण यांनी कुठलाही विकास आराखडा दाखवलेला नाही. जर त्यांनी असे केले असते तर आम्हालाही सामना देताना समाधान वाटले असते. पण आता यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. हे काम जर पोलिस आणि निवडणूक यंत्रणेनं केले नाही, तर आमचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक करतील. जेथे जेथे निवडणुका आहेत, तेथे आम्ही लक्ष ठेवू आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी युती का तुटली, यावर भाष्य करताना राणे म्हणाले, आम्ही युतीच्या मनोमिलनासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. दीपकभाई केसरकर यांनीसुद्धा 21 तारखेपर्यंत वाट पाहिली. आम्ही त्या तारखेपर्यंत युतीसाठी आग्रही होतो. केसरकर यांनी तर शेवटच्या दिवशीही त्यांच्या कार्यकर्त्यांचे अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली होती. एवढा मनाचा मोठेपणा कोणी दाखवतो? पण भाजपच्या वरिष्ठांनी युती होऊ दिली नाही. हे सगळं लोकांसमोर आहे आणि सावंतवाडीतले लोक आम्हाला व केसरकरांना आशीर्वाद देतील, असेही निलेश राणे म्हणाले.


