खाडेंच्या सहकाऱ्याने थेट नाव सांगत टाकला बॉम्ब…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर मांदगाव (बीड जिल्हा सीमेवर) येथे जीवघेणा हल्ला झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातून बीडकडे आपल्या सहकाऱ्यांसह कारने जात असताना मांदगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.
तेथून निघताच तोंडाला रुमाल बांधलेल्या 10 ते 12 संशयितांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढवला.
हल्लेखोरांच्या हातात सत्तूर, काठी आणि बंदुकीसारखी शस्त्रे होती. त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. मुख्य लक्ष्य मात्र राम खाडे हेच होते. रक्तबंबाळ अवस्थेत खाडे बेशुद्ध पडले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तात्काळ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता या हल्ल्याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राम खाडे यांच्यावरील हल्ल्याचा सूत्रधार हे भाजप आमदार सुरेश धस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी केला आहे. सुरेश धस यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच खाडे यांच्यावर धसांनी हल्ला घडवून आणला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे CID आणि SIT स्थापन करून सुरेश धस यांची चौकशी करावी, अशी आमची त्यांनी मागणी आहे.
राम खाडे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून या हल्ल्यामागे उघडपणे सुरेश धस यांचाच हात असल्याची शक्यता असल्याने सुरेश धस यांची या प्रकरणांमध्ये चौकशी करावी, अशी मागणी पोलिसांकडे केल्याचे चौधरी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात अगोदर सुरेश धस यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन निष्पक्षपणे चौकशी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
सुरेश धस घरात बसून हे सगळे प्लॅन करत आहेत, राजकीय षडयंत्राने विरोधक संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला. या सर्वांची एसआयटी चौकशी करावी. जे जे सुरेश धस यांच्याविरोधात जिल्ह्यात काम करतात, त्यांच्यावर असे हल्ले सुरेश धस घडवून आणतात, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.


