हिंगोलीत प्रचाराची पातळी घसरली…
हिंगोली नगरपालिकेतील प्रचाराची पातळी खालवली असल्याचे गेल्या काही दिवसापासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून दिसून येत आहे. विकासकामाच्या मुद्यावर निवडणुक लढण्याऐवजी हा कसा वाईट, तो किती बदमाश याचीच उजळणी बांगर-मुटुकुळे यांच्याकडून केली जात असल्याने मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.
तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कंलक असल्याची टीका काल केली होती. त्यांच्यामुळेच शहरात मटका, जुगार, वाळूमाफिया, अवैध गुटखा विक्रीचे प्रकार सुरू झाले, असा आरोपही मुटकुळे यांनी केला होता. एवढ्यावरच न थांबता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे रडत सांगणारे बांगर एकनाथ शिंदे यांच्याकडून पन्नास कोटी मिळल्याबरोबर त्यांच्यासोबत गेले, असा आरोपही मुटकुळे यांनी केला.
यावर पित्त खवळलेल्या संतोष बांगर यांच्याकडून उत्तर आले नाही तर नवलच. तान्हाजी मुटकुळे हा घरात येऊ द्यावा, असा माणून नाही. त्याची आया-बहिणींवर वाईट नजर आहे. तो महिलांवर अत्याचार करतो, अशा शब्दात गंभीर आरोप केले. ‘या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या मायबाप जनतेने यांना घरामध्ये येऊ देवू नये, त्यांची वाईट नजर आहे.
दरम्यान, हिंगोली नगरपालिकेतील प्रचार आता मुद्यावरून गुद्यांवर येतो की काय? अशी भिती मतदारांना वाटू लागली आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना-भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांनी एकमेकांचे असे वाभाडे काढणे कोणालाच आवडलेले नाही. भाजपचे आमदार मुटकुळे यांच्याकडून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्यामुळे जिल्ह्यात अवैध धंदे कसे वाढले? याचा पाढा वाचला जातोय. तर त्याला उत्तर देताना बांगर यांनी थेट मुटकुळे यांच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त करत आरोप सुरू केले आहेत.


