आता अजितदादा म्हणाले; मस्ती आलेल्या…
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला.
त्यामुळे भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. दरम्यान, नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी ” अजित पवार कोणाचाही नाद करा, अनगरकरांचा नाही’, असं म्हणत चॅलेंज दिलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात जात त्याला प्रत्युत्तर दिलंय. यावेळी उज्ज्वला थिटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश देखील झालाय.
आता अजितदादांचं जोरदार प्रत्युत्तर
अजित पवार म्हणाले, उज्वला थिटे यांच्याबाबत काय झालं, हे आपण बघितलं. आपल्याकडे लोकशाही आहे. संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहायचा अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. आधुनिक महाराष्ट्र घडवणारे, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाच्या मार्गावर आपण पुढे जात आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी चव्हाण साहेबांनी जे काम केलं, त्याच कार्यातून, त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आम्ही जनसेवेचं काम करत आहोत, असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट केलं.
बळीरामकाका साठे यांनी अन्यायाविरोधात उभं राहण्याची भूमिका कायम घेतली. 24 वर्ष सरपंच म्हणून, नंतर जिल्हा परिषद सभापती तसंच नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली. आपलं काम सांभाळताना त्यांनी कधी कोणाला दुजाभाव दाखवला नाही. पक्षात त्यांच्या येण्यानं जनकल्याणाच्या कार्याला गती मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. मौजे वडाळामध्ये विकास घडवून आणणं ही आमची जबाबदारी आहे. कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही, अशी खात्री दिली. शेतकरी सुखानं राहिला पाहिजे. शेतकरी मोडला तर राज्य मोडतं, ही वस्तुस्थिती असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली.


