शरद पवार गटाची मोठी खेळी…
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळतं आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष देखील वाढला आहे, शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज आहे, तर दुसरीकडे बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत, मात्र यामुळे आता दोन्ही पक्षातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही. मी नंतर उत्तर देईल.निलेश राणे जे आरोप करत आहेत ते खोटे आहेत, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता शिवसेना शिंदे गटाला थेट युतीची ऑफर देण्यात आली आहे, याबाबत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे?
शरद पवारांनी सांगितले होते, भाजप सोडून कुणाशीही आघाडी करा, त्यानुसार कुर्डूवाडीत आमची युती शिवसेना शिंदे गटासोबत झाली आहे. ज्यावेळेस फार अति होतं तेव्हा बंड होतं. हा नियतीचा नियम आहे. त्यांनी मनात आणलं तर ही नवी नांदी होऊ शकते. दुसऱ्या सातारकरांनी ठरवायचं आता काय करायचं ते, आम्ही तर कुर्डुवाडीत निर्णय घेतला आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी थेट शिंदे गटाला ऑफर दिली आहे, त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाची नाराजी वाढतच चालल्याचं दिसून येत आहे.


