आता प्रत्येक विदेशी नागरिकाला…
अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसपासून काही अंतरावरच गोळीबाराची घटना घडली. यात राष्ट्रीय सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्या व्यक्तीने सुरक्षा जवानांवर गोळीबार केला, तो अफगाणिस्तानी आहे आणि तो सप्टेंबर २०२१ अमेरिकेमध्ये आला होता. इतकंच नाही, तर ट्रम्प यांनी अमेरिकेत राहत असलेल्या सर्वच परदेशी नागरिकांबद्दल मोठं विधान केले आहे.
एका निवेदनात ज्वॉईन टास्क फोर्स डीसीने म्हटले आहे की, बुधवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी हा हल्ला झाला. फरगट स्क्वेअर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडातील त्यांच्या मार ए लागो क्लबमध्ये होते. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये हल्लेखोरही जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रहमानुल्ला लकनवाल असे आरोपीचे नाव आहे.
गोळीबाराच्या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?
व्हाईट हाऊसजवळ झालेल्या या गोळीबाराच्या घटनेवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आणि माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेत आलेल्या अफगाणिस्तानी लोकांची पुन्हा तपासणी करण्याची आता गरज आहे, असे म्हटले आहे.
ट्रम्प म्हणाले, “बायडेन यांच्या सरकारच्या काळात अफगाणिस्तातून अमेरिकेत आलेल्या प्रत्येक परदेशी नागरिकाची चौकशी झाली करण्याची आता गरज आहे. आम्हाला त्या प्रत्येक व्यक्तीला देशातून हाकलण्यासाठी अत्यावश्यक पावले उचलावी लागतील, ज्यांना इथे राहण्याचा हक्क नाहीये किंवा त्यांचा या देशाला कोणताही फायदा नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प असेही म्हणाले की, “थँक्स गिव्हिंगच्या पूर्वसंध्येला वॉशिंग्टन डीसीमध्ये ड्युटीवर असलेल्या नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. व्हाईट हाऊसपासून काही पावले अंतरावर ही कट रचून ही घटना घडली. हा संपूर्ण देशाविरोधातील आणि मानवतेविरोधात गुन्हा आहे.”
गोळीबार करणारा रहमानुल्लाह जखमी
सूत्रांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या एका २९ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. रहमानुल्लाह लकनवाल असे संशयिताचे नाव आहे. त्याने गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी गोळीबार केला होता, त्यात रहमानुल्लाह जखमी झाला आहे. तो अफगाणिस्तानी नागरिक असून, २०२१ मध्ये अमेरिकेमध्ये आला होता. अमेरिकेच्या विधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबाराच्या घटनेचा तपास दहशतवादी घटना म्हणूनच केली जात आहे.


